गेल्या महिन्यात नीट विषयक जो काही घटनाक्रम आपल्या देशात घडला त्यामुळे आपण सारेच जण अस्वस्थ झालो. प्रत्येकाने ज्याचीत्याची डावी उजवी मतं कधी मांडली कधी दाबून ठेवली…काळ हे औषध असतं असं म्हणतात तसा यातून मार्ग निघेल किंवा नवा तयार होईलही.
पण हे वाटलेलं जे काही आपल्याला आहे…आपण कधीतरी दात ओठ खाऊन व्यक्त होऊन.. कधी लाजेने मान खाली घालून…कधी डोकं आपटून घेऊन तर कधी पळून जाऊन जो काही विषय मांडू बघतोय तो मुळात आपल्याला समजतो तरी का असंही बरेचदा वाटून जातं…
कालपर्यंत वाटत असलेली स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेबद्दलची नितांत श्रद्धा आपल्याला वाटते का नाही…एक पालक म्हणून आपण ती पुढे देऊ शकणार आहोत की नाही… प्रत्येकच गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या युगात हे संस्कारांचं देणं देण्याचा किमान प्रयत्न तरी केला होता हे कुठे आणि कसं लिहून ठेवायचं…
अनुत्तरीत प्रश्नांची यादी वाढतच जाईल… वाढती गर्दी, वाढतं प्रदूषण, वाढता गोंगाट, सिक्युरिटीचा जथा जाईपर्यंत ताटकळत उभा राहिलेला ट्रॅफिक, आरक्षणामुळे न मिळणारा प्रवेश, बदलेली भाषा, अवाच्या सव्वा वेगाने धावणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जवळ आलेलं जग …
तूर्तास या सगळ्या विचारांच्या गुंत्यातून बाहेर आणणारं एक पुस्तक हाती आलं…अभिजीत जोग लिखित भारत – सत्य, सत्व, स्वत्वआपले वेद, उपनिषदं आपला इतिहास, आपली संस्कृती विशद करतात. भारताचे भौगोलिक स्थान, भारतावर झालेली आक्रमणे, भारतीय भाषा, भारतीय संशोधने: विश्वाची निर्मिती, काळची संकल्पना, अंकगणित, खगोलशास्त्र, बीजगणित, भूमिती, काही महान गणितज्ञ ऋषी, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, भाषाशास्त्र, तत्वज्ञान, यांच्या माध्यमातून भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेची ओळख आणि पुढे अनंत काळ वाचन, चिंतन करता येईल अशी माहिती यात आहे.
भारताच्या समाजाची अर्थव्यवस्थेशी असणारी एकात्मता आणि धार्मिक अधिष्ठान यामुळे भारताकडे असणारी सुखी, समाधानी, चैतन्य शील राष्ट्र भावना, विचार स्वातंत्र्याचा उगम, तत्वज्ञानाच्या विविध दर्शनातून त्याचा केलेला ऊहापोह, स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था यांचं संतुलन असा माहितीपूर्ण प्रवास ‘धन्योस्मि भारतत्वेन’ (… माझं भाग्य आहे की मी एक भारतीय आहे) या विचाराकडे किंबहुना प्रेरणेकडे नेऊन सोडतो…
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे पुस्तक वाचून मनात आलं की ही इतिहासाची उजळणी नव्हे; तर आपण कोण आहोत, आपल्या मुळांकडे आपण कसं पाहतो आणि पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहोत, याचा विचार करण्याची एक संधी आहे. आपण आपल्या वेद-वाङमयाचा अभ्यास करून मगच मत बनवायला हवं… इतकं तरी आपण आग्रहाने म्हणू शकतो… प्रत्येक वेळी नवी पिढी जुन्या पिढीला प्रश्न विचारतेच त्यांना नुसतं ‘आपला देश महान आहे’ असं सांगून भागणार नाही… ‘का?’ या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपला अभ्यास हवा आणि आपल्या मुळांवरचा विश्वासही भक्कम हवा.
