Daily writing prompt
Dogs or cats?

प्राण्यांनी प्राण्यांच्या विश्वात राहावं आणि माणसांनी माणसांच्या. प्राण्यांवर दया दाखवावी पण अतिरेकी प्रेम किंवा त्यांना मानववत बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे योग्य नाही.

कैक काळापासून कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्याला माणसांशी मैत्री करता येते. त्याला घराची, शेताची राखण करता येते. अगदी कुटुंबाचे रक्षणही करता येते याच्या कथा आपण वाचल्या आहेत आणि ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्धही झाले असेल. त्यामुळे त्या प्राण्याला आदर देऊन त्याचा पोलिसांनी वापर केला आणि तो मोठ्या घराबाहेर असावा हे ठीक. नुसतीच Be aware ची पाटी पण पुरेशी असते.

पण मांजर या प्राण्याबाबत तर अशी ठळक गोष्ट आठवतही नाही. लहान मुलांच्या गोष्टीत सुद्धा ती फसवाफसवी कर, अंगावर फिसकार, चोरुन दूध पी, उगीच इतर बारक्या प्राण्यांना त्रास दे असले फावले उद्योग करताना दिसते.

सध्या मात्र ह्या प्राण्यांवर प्रेमाचा जो वर्षाव केला जातो ते पाहून नक्की विचार काय करावा हे कळेनासे होते. कबुतरांना धान्य दाणे टाकणारे आणि रस्त्यावरच्या प्राण्यांना खाऊ घालणारे धन्य असतात. म्हणजे प्राण्यांचा विचार करता करता बहुधा ते मानव समाजाचाही आपण एक भाग आहोत हे विसरून जात असावेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यावर सध्या तरी बंदी घातलेली नाही. मात्र, प्राण्यांची काळजी घेताना माणसांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. जमल्यास त्यांना घरी जाऊन खायला घालावे.

…घरी न्यायचं नसतं म्हणून तर रस्त्यावर खायला घालत असणार… कारण उरलेलं त्यांचं कोण करणार?

एवढंच कशाला … पाळलेली कित्येक कुत्री फिरायला नेली जातात तेव्हा रस्त्यावर घाण करतात, किंबहुना बरोब्बर दुसर्याच्या दारासमोर घाण करतात.

तेव्हा ह्या प्राणी पालनाचा.. प्रेमाचा एकूण कारभारच विनोदी आणि खोटा वाटतो. आपण राहतो त्या आजूबाजूच्या परिसरात इतर माणसे ही राहतात… तेव्हा थोडी सदसद्विवेकबुद्धी वापरायला हरकत नाही.

आता हे सांगण्यासाठी न्यायालयात जावे लागले हेच मुळात कमाल आहे. तरी पण यावर कडक कारवाई करुन हे उद्योग बंद करायला हवे.

देशात करण्यासारखी अजून कैक कामे आहेत ती करावी उगीच असली कामे करुन… निसर्ग, भूतदया, सार्वजनिक कल्याण, वैचारिक प्रबोधन, समाजसेवा करण्याचा आव आणू नये. मुळात ग्रृहितकच चुकीचे आहे, कारण माणूस हा प्राणी असला तरी प्राणी हा माणूस नाहीच!!!!

कॉल ऑफ द वाईल्ड पुस्तकाचे परीक्षण

मी आणि पाळीव प्राणी ….