कॉलेजमध्ये असताना जीएंचं लेखन आणि त्याबद्दलही खूप ऐकलं. ते मुद्दाम वाचायला मात्र घ्यावंसं वाटलं नाही कारण ते कायमच गूढ, अनाकलनीय वाटत राहिलं. सध्या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बरेच कथावाचनाचे कार्यक्रम होताहेत. तेव्हा घरात असूनसुद्धा न वाचलेलं पुस्तक जरा वाचून तरी बघूया म्हणून खरं तर वाचायला घेतलं.

पिंगळावेळ: कथांचं पुस्तक…. दीर्घ कथांचं. अगदी पुस्तकाच्या नावापासूनच कपाळावर आठ्या आल्या. पिंगळा ही संकल्पना सुद्धा मला पहिल्याप्रथमच भेटली. पिंगळा म्हणजे घुबड आणि त्याची वेळ म्हणजे रात्र इथपासून ते पिंगळा म्हणजे एक लोककलेचा प्रकार अशी माहिती मिळत गेली.

पिंगळा विषयी: https://kalarasik.blogspot.com/2015/08/blog-post_26.html?m=1

कुठली कथा कुणाला कधी आणि का आवडते हे खरंतर अनुभव म्हणून लिहून ठेवावं इतकंच कारण दुसऱ्याला ते तसं वाटतंच असं नाही. किंबहुना कवितेचा अर्थ कसा प्रत्येकाने ज्याला हवा तो लावावा तसंच या कथांचंही. हे पुस्तक वाचताना मात्र सतत दुखा:ची सावली बरोबर वावरत असल्याचा भास झाला. त्यांची सर्व पात्र खरेतर असतात सामान्य पण त्यांची दु:ख असतात हिमालय एवढी. कथानकात नायक नायिकांना निरनिराळ्या दु:खांशी झुंजताना नशीबही साथ देत नाही. मग समोर ठाकते ती गरीबी, अपयश, कडेलोट, वा मृत्यू, मग ते या भावभावनांच्या गुंत्यातून हा जीवघेणा संघर्ष कसा करतात याच्या या कथा. कमाल वाटते ती एकाच वेळी दोन टोकाच्या कल्पनांना सहजी पेलत कथा उलगडून दाखवण्याच्या त्यांच्या विचारशक्तीची. देव नावाच्या शक्तीवर असणारी श्रद्धा, जन्माला आल्यानंतर का आलो, जगत असताना खरंच कोणाला आपली गरज आहे का, आपण नसल्याने तरी कोणाला काही फरक पडेल का असे प्रश्न ते अगदी सहजी समोर आणतात आणि त्याची तटस्थपणे उत्तरे देतात अर्थात कितीही नकारात्मक असली तरीही. सरते शेवटी आपले अनुभव बहुअंशी अतिशय सामान्य आहेत अशीही जाणीव होऊन जातेच.

ऑर्फियस, स्वामी, कैरी, वीज, फुंका, तळपट, मुक्ती, कवठे, घर, यात्रिक आणि लक्ष्मी पिंगळावेळमधील कथा. या विविध नियतकालिकांंतून प्रकाशित झालेल्या आहेत. या कथांचं मला अद्भूत वाटतं ते म्हणजे प्रत्येक कथेमध्ये नाट्य आहे, कथाभाग डोळ्यासमोर उभा राहतो. ऑर्फियस कथेला ग्रीक पार्श्वभूमी आहे हे त्यातील नावांवरून लक्षात येते तर यात्रिक कथा स्पॅनिश कथेवर आधारित असल्याचे दिसते. मुक्ती ही महाभारतातील एकलव्याच्या कथेला दिलेली विलक्षण कलाटणी, दिशा किंवा आजच्या भाषेत जी एं चा टेक म्हणू शकतो. त्यांच्या कथांतून गाव, गावातील माणसे, तेथील रिती रिवाज, यांची झळ सोसलेली माणसं भेटली ती कैरी, वीज, तळपट, घर, फुंका, लक्ष्मी या गोष्टींमधून. लहान मुलांच्या भावविश्वातली कथा असली तरी नशीब साथ सोडून जातानाच दिसतं. डोक्यात अनंत का उभे राहतात पण सत्याचं नाणं खणखणीत असतंच, उगीच छान वाटावं, वाचायला बरं वाटावं म्हणून सुद्धा त्यात काही बरं घडत नाही. प्रत्येक कथा वेगळी आहे खरी पण दुर्दैवाचे दशावतार की काय म्हणतात ते हे! माणूस एखादी गोष्ट करताना अवधानाने, कित्येकदा अनवधानाने चुका करीत असतो, तो त्यातून शिकतो आणि पुढे जातो. तसलं काही इथे नाही. इथे मिळते शिक्षा.

स्वामी ही दीर्घकथा एक विलक्षण अनुभव देते. ही कथा पुन्हा वाचावी असे वाटावी इतकी सुरेख. माणसाच्या असण्या नसण्याच्या नाजूक रेषेवर दोन्ही गोष्टी त्याच्या हातात असताना तो त्या कशा वापरतो, तेव्हा त्याला कोणते प्रश्न पडतात, कोणत्या आशा असतात आणि खरं पाहता हाताबाहेर असलेल्या भविष्याकडूनही त्याच्या काय अपेक्षा असतात त्याची ही गोष्ट. या कथेचा नायक सहज म्हणून न ठरवता स्वत:च्या जुन्या गावात थांबतो, जुन्या आठवणीत वेळ घालवतो आणि संध्याकाळी पुन्हा परत जायला निघतो. तेव्हा त्याला इक महंत भेटतो. तो त्याला त्या रात्रीपुरता आसरा म्हणून मठात घेऊन जातो. पण तिथून पुन्हा बाहेर येणं त्याच्या नशिबात नसतं. तेव्हा त्या कोंडलेल्या तळघरात त्याला जेव्हा एक हिरवा कोंब दिसतो तेव्हा त्याला ते नकोसं झालेलं आयुष्यही जगावंसं वाटतं किंबहुना तो गेल्यानंतर त्याने वाढवलेला तो कोंब ही झाड बनून जिवंत राहावा असं वाटत राहतं.

असं हे जी.एं. पिंगळावेळ. कथा कशी असावी, कुठली कथा वाचावी किंवा कथा कशी लिहावी याचा अनेक पदरी कोर्स तयार होऊ शकेल असा सिलॅबस घेऊन येणारं हे पुस्तक. पुस्तकाच्या मलपृष्ठावर छापलेल्या परिच्छेदाची सुरुवात आहे Stranger, think long before you enter, वाचकाला गंभीर विषयाच्या समीप नेत असल्याची सूचना म्हणायला हरकत नाही.