माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यानं मुलांना पुस्तकं वाचायला देताना आधी मी ते वाचून मगच त्यांना देते. तशी टिनटिन चा फडशा पाडल्यानंतर भेटली ही एनिड ब्लायटन.
द फेमस फाइव्ह ही तिने लिहिलेल्या मुलांच्या साहसकथांची मालिका आहे. या कादंबऱ्यांमधील प्रमुख पात्रे आहेत, जॉर्ज, डिक, अॅन, ज्युलियन आणि जॉर्जचा कुत्रा टिमी. जॉर्ज ही अशी मुलगी आहे जिला आपण मुलगी नसून आपण मुलगा आहोत असं दाखवायला आवडतं. ती तसे कपडेही घालते आणि तसेच केस ही ठेवते. तिचा स्वभावही अगदी कणखर आणि मजबूत आहे. तिच्या आईला मात्र जॉर्ज एकटी मुलगी असल्याने ती थोडी हट्टी आणि न ऐकणारी बनलेली आहे असंच वाटतं. या जॉर्जचे बाबा शास्त्रज्ञ आहेत. त्यायोगे येणारा थोडा तापटपणा, विक्षिप्तपणा, वेंधळेपणाही त्यांच्या वागण्यातून दिसून येतो. ज्युलियन, डिक आणि ऍन ही जॉर्जची चुलत भावंडे आहेत. ह्या सर्व मंडळींबरोबर आहे जॉर्जचा विश्वासू कुत्रा, आता याला पाळण्यासाठीही जॉर्जला खूप कष्ट करावे लागलेले आहेत. तिने तिच्या भावंडांसोबत केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमांमध्ये टीमीने तिला साथ दिली आहे त्यामुळे अखेरीस आईवडिलांकडून टीमीला त्यांच्या घराचा भाग बनवण्यात तिला यश मिळवलेलं आहे.
या कथा घडतात किरिन कॉटेज येथील जॉर्जच्या कुटुंबाच्या घराजवळ. किरिन बे मधील जॉर्ज आणि तिच्या कुटुंबाच्या मालकीचे नयनरम्य किरिन बेट ही या मुलांची सगळ्यात आवडती आणि रहस्यमय जागा. या साऱ्या जागा शेकडो वर्षांपुर्वीच्या असल्याने त्यात कितीतरी गुप्त मार्ग, हरवलेला खजिना किंवा तस्करांचे बोगदेही आहेत. अर्थात लेखिकेने निवडलेला हा साचा रहस्य आणि साहस या दोन्ही कथांसाठी पूरेपर गोष्टी देणारा आहे. यातील बहुतेक गोष्टी मुले जेव्हा बोर्डिंगस्कूलमधून सुट्टीत घरी परत येतात तेव्हा घडलेल्या आहेत. कुमार वयातील या मुलांच्या अंगातील उत्साह, धडाडी, त्यांचं आत्मविश्वासाने गावात फिरणं, समुद्रातून बोट नेणं विलक्षण वाटतं. त्यांची बेटावरची सहल तर भन्नाटच वाटते.
या कथांमध्ये कधी चोर सापडतो, तस्करी होताना आढळते, तर कधी अपहरण केलेली लहानगीसुद्धा सापडते. या मुलांच्या अगदी जवळपास असणाऱ्या नोकर-चाकर, शिक्षक ते गावातील लोकांमध्येही हे गुन्हेगार त्यांना दिसून येतात. त्यांची तक्रार करून पोलिसांना सगळा घटनाक्रम उलगडून दाखवेपर्यंत एकेक लघुकथा रंग भरत जाते. या कथा साधारण १९४२ ते ६२ या काळात प्रकाशित झालेल्या आहेत.
आपल्या मुलांसाठी २१ पुस्तकांचा हा संच वर्षभरासाठीचा एक खजिना आहे असं म्हणायला हरकत नाही.
यात त्रुटी आहेत का तर … या कथांमध्येही तोचतोचपणा आहे, काहीतरी संकट येणार मग ही मुले मोठ्यांच्या मदतीशिवाय मार्ग काढणार, इतकेच नव्हे तर गुन्हेगाराला पकडूनही देणार, त्यांना एखादा भुयारी मार्ग सापडणार किंवा गुप्त खजिना… हे सतत घडत राहतं. पण तरीही आपल्याला त्या कथा वाचण्याचा कंटाळा येत नाही. हेच कदाचित या कथांचं यश म्हणावं लागेल.
हे वाचत असताना आपल्याकडे मराठीत अशी लहान मुलांसाठी पुस्तके, पात्रे आहेत का असं आलं… मग जरा उजळणी करत फास्टर फेणेची साहसकथा, बिनधास्त, अतरंगी तरीही लाघवी बोक्या सातबंडे किंवा चिंटू, एक हजार सातशे बहात्तर वेळा वाचावा असा वनवासचा लंपन आठवले, या सर्वांवर कडी करतील अशी स्वराज्याची स्वप्न प्रत्यक्षात आणणारा शिवबा, लहानपणापासून मोठं जग बघू शकणारी संतमंडळी आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे कितीतरी क्रांतिकारक डोळ्यासमोर आले आणि आपली संस्कृती न् भाषा काकणभर जास्तच समृद्ध असल्याची जाणीव झाली.

द फेमस फाईव्ह या पुस्तकाचं परीक्षण वाचलं. परीक्षण वाचून मुलांना पुस्तक वाचावे वाटेल हे नक्की. त्याशिवाय तुम्ही मराठीतील पुस्तकांची यादी दिली आहे ती ही मुलांना वाचाविशी वाटतील अशीच आहेत. यातून वाचन संस्कृती वाढेल हे नक्की! वाचाल तर वाचाल हेच खरं!
LikeLike
चांगली आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतेय,या पिढीची आव्हाने वेगळी असणार.
LikeLike