
तशी ही गोष्ट फारशी नवी नाही. मला काल साक्षात्कार झाला इतकंच. पुण्यातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर दुचाकी पार्किंग करतानाची ही घटना. खेळाची मैदानं शोधूनच सापडवावी लागतात त्यात तिथेच सगळी लहान मुलं खेळायला येतात. तिथेच जिम आणि इतर सर्व सोई केलेल्या असतात. अशात संध्याकाळी बेफाम गर्दीतून वाट काढत आई-वडील मुलांना खेळायला घेऊन येण्याचं कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत असतात. त्यातच मी एक होते. त्या रस्त्याला फक्त एका बाजूने पार्किंगची सोय. दुसरीकडे गाडी पार्क करून वाहन चालक त्यावर बसलेला असेही काही दिग्गज होते… ते असो.. तर एकेरी बाजू या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरून आले. एकही जागा शिल्लक नव्हती. कोणीतरी काढताना दिसलं असेल की, हो, दिसलंच ताबडतोब मंगल कार्यालयात जेवणाच्या पंक्तीत मागे लोक उभे राहतात तशी त्या गाडीच्या मागे जाऊन उभी राहिले. एक बाई जिममधून बाहेर आल्या. गाडीपाशी उभ्या होत्या. त्यांनी त्यांची पिशवी पायापाशी ठेवली. दुचाकीच्या पायात. मग त्यांनी डिक्की उघडली. त्यातून स्कार्फ आणि गॉगल गोगलगाय गतीने बाहेर आले. त्यांनी स्कार्फ डोक्याला बांधून गॉगल लावला. आता गाडी बाहेर काढणार म्हणून मी हुश्श केलं…मनात अर्थात. मग त्यांनी पिशवी पुन्हा हात घेतली, ती उघडली. खेळातली पाच मिनिटं बुडलेली होती,
त्यामुळे मी त्यांना न राहवून विचारलंच, तुम्ही गाडी काढणार आहात का? एक नाही दोन नाही. त्यांनी गाडीची किल्ली काढली पिशवीत ठेवली. म्हणाल्या येस, बट आय नीड टाईम. पुन्हा स्कार्फ नीट केला. आरशात बघितलं. मी पुन्हा, निघणार असाल तर गाडी फक्त बाहेर घेता का प्लीज?
तेवढ्यात एक भले काका-काकू मागून ओरडले. इकडे लावा.. आम्ही काढतोय गाडी. मी गाडी लावली. पुन्हा निर्लज्यपणे या बाईंकडे गेले, आता गाडी बाहेर निघत असावी… मला मिळू नये म्हणून कदाचित त्या थांबल्या होत्या…मनात विचार.. आणि म्हणाले त्यांना, अहो, रस्त्यात कुठेच जागी नव्हती मी बघून आले होते म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट केली. त्यावर त्या बाई म्हणाल्या, आय कान्ट टॉलरेट धिस! मी बावळटासारखी बघतच राहिले.
मला अजून कळत नाहीये, नक्की काय होतं हे?
यांचा अपमान झाला? कसा काय? मी केला का? तो कसा? यात सहन न होण्यासारखं काय होतं?
बरं, टाटा बिर्ला असत्या तर रस्त्यावर गाडी लावाली लागली नसती. हुशार असत्या तर संध्याकाळीकाळा गॉगल का लावला असता? फिट असत्या तर जिममध्ये कशाला गेल्या असत्या? अमराठी असत्या तर प्लीज आणि रिक्वेस्ट एवढं तरी कळलं असेलच, आणि उत्तरं पण तशी सुसंबद्धच म्हणायला हवीत….
मला अजूनही याची उत्तरं मिळालेली नाहीत. पण भारतीय माणूस इंटॉलरंट झालाय याचा मात्र नवा किरण मला दिसून गेला.
बाकी … टू व्हीलरचा नंबर बघून ठेवलाय पण म्हटलं जाऊदे बाईंना अजून इंटॉलरंट व्हायचं……असो.
गणूची सातवी गोष्ट: ऑक्सिजन
गणूनी एकेकदा काहीतरी करायचं ठरवलं की तो ते करतोच. मग ते काहीही असू दे. अगदी फरशीवर रेघा काढून तयार केलेलं छत्रपतींचं राज्य असू दे किंवा आईच्या ओढणीचे प्रत्येक दारात बांधलेले बांध असू दे. ते सगळं अतिशय खास असतं आणि ते मोठ्यांना अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही. लागेल तुला पडशील तू म्हणत ते आवरत राहतात आणि गणू वैतागून जातो. एक दिवस असंच गणुनी झाड लावायचं ठरवलं. ठरवलं की ठरवलं. गणू हातात एक लहानसा प्लास्टिकचा डबा घेऊन बागेत गेला सुद्धा. एकीकडे बडबड चालू होती. आधी माती घालूया. माती त्या डब्यात घातली गेली. ती मोकळी पाहिजे नं असं म्हणत म्हणत त्यात भरपूर खेळणं झालं. तिथेच जवळच्या कर्दळीच्या बिया घेतल्या आणि त्या त्यात घातल्या. आई, ये बघ मी झाड लावलं. आरोळी ठोकली. आई बाहेर येत येत म्हणाली. अरे, झाडाला पाणी लागतं.. तेवढ्यात गणुनी पाईप हातात घेतलेला. पाणी सुरु केलेलं. त्या लहानशा डब्यात पाईपनी पाणी घालायला सुरुवात केली. पाणी डब्यात गेलं, माती बाहेर पडली, बिया दिसेनाशा झालेल्या. भरपूर चिखल आणि डबाभर पाणी. आई रागवतच नाहीये ते बघून गणुनी पटकन पाणी बंद करून हात पाय धुतले. स्वारी थेट घरात जाऊन शांत बसली. आईनी हळूच विचारलं, आता काय करणारेस? अगं झाडं ऑक्सिजन देतात नं, तर श्वास घेऊन बघतोय. पण ऑक्सिजन सापडतच नाहीये.
गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html
गणूची पाचवी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post.html
गणूची सहावी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post_5.html
