नव्या वर्षाला सुरुवात झाली. ती उत्साहाने, आनंदाने असं म्हणेपर्यंत आपण नव्या वर्षातला महाराष्ट्रातला एक अस्वस्थ दिवस जगलो सुद्धा. स्वप्न आणि वास्तवातला हा फरक. स्वप्न गोड, वास्तव कडवं. असत्य छुपं आणि सत्य उजळ. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन होताहेत तोच रस्ता बंद, महाराष्ट्र बंद चे नारे. येत्या काळात आपला देश आणखी पुढे जाईल, प्रगती करेल, विकासाचे पुढे पाउल टाकेल म्हणत नवी आशेची ज्योत पालवतेय तोच आम्ही 200 पावलं मागे निघून जातो. एकीकडे सवित्रीबाईंना मानाची फुलं वाहतोय आणि दुसरीकडे शाळा बंद ची बातमी कानावर येतेय. व्हॅन काका येणार नाहीत त्यामुळे मुलं शाळेत जाऊ शकणार नाहीत. रस्त्यावर दगडफेक होईल की काय म्हणून आई वडील घाबरून मुलांना शाळेत सोडत नाहीत. शाळेत आलेल्या त्या 10% विद्यार्थांची काळजी घ्यावी लागणार म्हणून शाळा त्रस्त. बरं शाळेत सोडूच नका सांगावं तर बंदाला पाठींबा दिल्यासारखं होईल. अशा वेळी करायचं तरी काय? प्रत्येकाला दुसऱ्याच्या मताची गरज आहे. कोण कोण शाळेत सोडताय? ‘ऍट युअर ओन रिस्क’ रस्त्यावर जायचं.  वाचताना ऐकताना काल परवा सहज वापरले गेले पण हे शब्द फार गंभीर आहेत…. स्कूल बस रस्त्यावरून फिरत नव्हत्या….मनात विचार आला ….वर्तमानावर जी दगडफेक झाली ती भविष्यावर होईल? या मुलांना शाळा बंद आहे याचं काय बरं कारण सांगावं? त्यांना ते कळेल का? त्याचा अर्थ त्यांना कळेल का? त्याचे त्यांच्या मनावर काय परिणाम होतील आणि भविष्यात अशा घटनेला ते कसे सामोरे जातील? …….. या सगळ्या परिस्थितीत डोक्यात विचारांनी इतकी गर्दी केली. मंगल देशा ….. म्हणायच्या ऐवजी निर्लज्यपणे दंगल देशा .. म्हणाली तर? इतिहासाची पुनरावृत्ती होणं टळत नाही तळणार नाही. राजकारण, धर्मकारण आणि समाजकारण हे सारं जेव्हा भावनेच्या बळावर उभं असतं त्यावेळी हे घडतं का? इतिहास आणि भविष्य एकमेकांना असेच भेटत राहणार का? कोणास ठाऊक?
या अशा गढूळ परिस्थितीत खरं तर काहीच करावसं वाटत नाही. काही लोक असे दिवस सुट्टी म्हणून वापरतात काही मेंदूचा भुगा करतात. काही डोक्याला मेंदी लावायचं काम उरकतात तर काही चालू परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून व्हॉटस् ऍप बंद ठेवतात.
आफ्टर ऑल काय .. तर … सी यु डिसाईड ऑन युअर ओन असं म्हणत विषय बदलला जातो … असो. 
 
गणूची सहावी गोष्ट: शंकासूर
आई गणूला काय काय हाका मारत असते. कधी गणू, गण्या, गणोबा तोवर ठीक असतं. पण ती जेव्हा त्याला शंकासूर म्हणते तेव्हा ते त्याला नक्की लाडानी म्हटलंय की रागवून ते कधीही कळत नाही. पूर्वी त्याला सगळे म्हणायचे, किती गोड आवाज तुझा, किती छान बोलतोस, आणि बोलतो तेही कसं अगदी मनापासून. गणूचा गप्पा मारणे हा छंद च आहे. सोफ्याला मस्त टेकून बसायचं आणि जुन्या नव्या गोष्टींची उजळणी करायची. शाळेतल्या बाईनी कधीतरी सांगितलं प्रत्येक गोष्टीला ‘का’ विचारायला शिका. त्यातून तुम्हाला खूप माहिती मिळते. आता हा ‘का’ गणुनी भलताच मनावर घेतलाय. सकाळी उठल्यापासून गणूचे का चे पाढे चालू होतात. ब्रश करताना जी पेस्ट लावतो तिचा फेस का होतो? दुधाचं रंग पांढराच का असतो? पोट भरलं की ढेकर का येते? मग तशीच ढेकर गाडीत पेट्रोल भरलं की का येत नाही? देव सगळा वेळ कसा काय बघू शकतो? त्याला झोप येत नाही का? बाळ फक्त आईलाच का होतं? मेल्यानंतर लोक परत येतात का? मी मेल्यावर माझं नाव गणूच असेल का? आता यातल्या प्रत्येक प्रश्नाला समाधान होईपर्यंत उत्तर देता देता आई-वडील थकून जातात. आणि हे सगळे प्रश्न अतिशय घाई-गडबडीत विचारायचे असतात. असंच एकदा काहीतरी बोलता बोलता आई धावपळ करत येऊन एकदम म्हणाली, “गणू, या गप्पा नंतर मार, एवढ्या वेळात तुझे मोजे घालून झाले असते. शाळेत जायला उशीर होणार आता.” जरा वेळ शांतपणे गेला, गणू तयार होऊन हळूच विचारलं, “अजून चिडली आहेस का? अगं, या शूजवर बघ पाच का लिहिलंय .. म्हणजे पाच असा का लिहिलाय? म्हणजे पाच हा कायम असाच का काढायचा? कोणी ठरवलं की पाच असा काढायचा?” तेवढ्यात शाळेची बस आली आणि गणोबा ‘आल्यावर, हं आल्यावर’ असं खुणेनीच दाखवत गाडीत शिरले.  

गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html
गणूची पाचवी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post.html
गणूचीसहावी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post_5.html