
२०१७ संपलं २०१८ चालू. गेल्या वर्षातल्या किमान पाच तरी चांगल्या गोष्टी आठवता येतात का म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली तर चांगली भली थोरली यादी झाली. त्यामुळे दिवसाची सुरुवात उत्तम झाली. त्यात नवीन वर्षाची डायरी, तिचं पहिलं पान .. खरं तर त्यावर फार तर फार एखादी आवडती जुनी कविता लिहावी असंच वाटतं. थोरामोठ्यांनी काय काय लिहून ठेवलंय आपण मोठे काय उजेड लिहिणार … शिवाय जे लिहू ते वर्षाच्या अखेरीस वाचावंसं वाटायला हवं. माणसाच्या स्वत:कडून फार अपेक्षा असतात. त्या ओझ्यामुळेच निम्म्या गोष्टी जमत नसतील. असो. अशावेळी बागेतल्या फुलाकडे लक्ष जातं. नेमानं त्याला सुंदर फुलं येत राहतात. त्याचा रंग आणि गंध मोहवून टाकतो. अगदी आधीच्या क्षणी काय विचार करतो याचा विसर पडतो आणि विचार प्रसन्न होऊन जातात. फुलांच्यामध्ये ही किमया असतेच तशीच ती असते मुलांमध्ये…
गणूची पाचवी गोष्ट: चंद्रगणूला घरातून बाहेर जायला जर कुठे आवडत असेल तर ते ठिकाण म्हणजे शाळा. छोट्यांच्या या शाळेत गोष्टी मात्र मोठ्ठाल्या घडत असतात. हा मित्र माझा तो तुझा चे गट, कट्टी-बट्टीची भांडणं, धडपडीच्या खपल्या, लाडक्या बाई आणि आवडते शिपाईकाका. आधी आधी अभ्यास म्हणून भाषा शिकतोय, वस्तू मोजतोय आणि चित्र काढतोय हे गणूला कळतंच नव्हतं. जसजसं हे कळू लागलंय तसतसा अभ्याsssस हा भलताच गंभीर विषय होऊन बसलाय. एक दिवस असंच घरी अभ्यासाचा एक कागद आला. आजचा अभ्यास सोप्पाय म्हणत एक पान दहा मिनिटात संपवून नाचत गणू घरभर फिरला. मला एकदाही रबर वापरावं लागलं नाही नाही म्हणत दुसरं पान पाहिलं. त्यावर एक चित्र काढून ते रंगवा असं काम दिलेलं. वास्तविक तो दुधाचं बिल घेऊनही त्यावर चित्र काढून रंगवत बसला असता पण हे शिस्तीत काढायचं चित्र कसं बसं नाक मुरडत पूर्ण झालं. एक जिराफाचे पाय असणारी फताडी घसरगुंडी आणि एक बारीकसा झोपाळा असं बागेचं चित्र एकदाचं काढून रंगवून झालं. वा छान! म्हणेल म्हणून ते आईला दाखवलं, तर ती नेमकं म्हणाली, अरे एखादा तरी मुलगा खेळतोय असं दाखव की. झालं. गणोबा चिडून तरातरा निघून गेले, दोन मिनिटात परत आले. म्हणाले, रात्र झालेली आहे. त्यामुळे सगळी मुलं झोपलेली आहेत. चित्रात बदल एकच होता तो म्हणजे आकाशातला चंद्र.
गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html
