
गणूची तिसरी गोष्ट : गणपती
गणूला खूप खूप गोष्टी आवडतात. सकाळी उठून आजीच्या मांडीवर बसून राहायला आवडतं. खिडकीत बसून फुलांकडे बघत बसायला आवडतं. कणकेचा गोळा घेऊन सूर्य बनवायला आवडतो. मित्राबरोबर दंगा करायला आवडतो. सुपर हिरो बनून शहराला वाचवायला आवडतं. कधी कधी नुसतंच भांडायलाही आवडतं. खूप बडबड करून मोठी गोष्ट रचायला आवडतं. कविता बनवून आई-बाबांना चिडवायला आवडतं. “कसं काय जमतं ना मला सगळं” म्हणत संता बंतासारखं थापा मारायलाही आवडतं. त्याला विचारायचा अवकाश, तुला मोठेपणी कोण बनायचंय ? तर ते उत्तर पण तयार असतं. तेही दरवेळी वेगळं. लहानपणी गणूला फायरमन किंवा पोलीस होऊन शूर शिपाई बनायचं होतं. मधूनच शेफ होऊन एकदम भारी जेवण पण बनवावंसं वाटतं. काही दिवस बाबाचा बॉस होणार हे नक्की होतं… आताशा नवीन विचार आहे, मोठेपणी गणपती होईन म्हणतो…..
आज आधी गोष्ट आणि मग थोडंसं मनातलं, खूप दिवसांनी काहीतरी लिहूया म्हणून लिहायला कागद पेन हातात घेतलंय. समोर कागद पेन पण आहे आणि लिहावं असंही वाटतंय हे जेव्हा घडतं तेव्हाच लिहून झालं की खरं समाधान मिळतं. लिहीत रहा असं म्हणणार्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. कितीकदा वाटतं, दुसरा काय सतत प्रोत्साहन देणार नाही.. तरीही आपण लिहीत रहायला हवं. बापरे! ते फारच अवघड जातं. आम्हाला आपलं पदोपदी आगे बढो चा इशारा लागतो. त्यामुळे वाटणं आणि दाटणं कागदावर उमटतात राहतं. सध्या निमित्त निरागस गणूचं.
गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट:
