गणूच्या गमतीजमती कध्धी संपत नाहीत. त्याचं रोज काहीतरी नवीन चालू असतं, त्यातून तो नव्यानं शिकत असतो आणि आनंद मिळवत असतो. कालपरवा कुठेतरी वाचलं, लहान मुलं लवकर का झोपतात किंवा त्यांना कमी वेळात अधिक झोप का घ्यावी लागते? तर त्याचं उत्तर असं की त्यांना दर क्षणाला नवं काहीतरी शिकायला मिळत असतं, हे सगळे अनुभव त्यांच्यासाठी नवीन असतात. मग ते अनुभव घेऊन त्यांच्या मेंदूला शीण येतो आणि त्यांना लवकर झोप येते. 
असो, हा मुद्दा जरासा अवांतरच म्हणावा लागेल. तर, आपला गणू दुसरी गोष्ट घेऊन सज्ज आहे,
गोष्टीचं नावं आहे; खडू :
गणूला रंगीत खडूंचं भारी वेड. सुटी लागली की गणूची आईकडे मागणी असे, रंगीत खडू आणि भरपूर कागद असलेली मोठी वही. पांढरा शुभ्र कागद भराभर रेघा काढून भरवून टाकायचा आणि मग आईला रेघांचा अर्थ सांगायचा हे ठरलेलं. अर्थ फक्त इतकाच असायचा की, ‘मी काय काढलंय ते बघ, माझ्याकडे लक्ष दे.’ गणू मोठा होत गेला तसतसा हळूहळू वेटोळा गोळा कधी चेहरा, कधी सूर्य, कधी फुगा तर कधी बॉल बनला. त्रिकोणी आकार कधी टोपी बनला तर कधी डोंगर. आतापर्यंत वेगवेगळे रंग घेऊन येणारी सूर्य, चंद्र, पानं, रस्ता ही मंडळी ठराविक रंगात ओळखता येऊ लागली. त्यांना नेहमीपेक्षा वेगळा रंग दिला की ते विचित्र वाटू लागले. असं सगळं ठरलेलं बघून गणू भलताच वैतागला. खडूची पेटी उचलून कपाटात तळात ठेवून देत गाल फुगवून खिडकीतून बाहेर बघत बसून राहिला. अचानक कुठूनसा वारा आला आणि गुलमोहोराचा सडा पडला. रस्ता अपोआप रंगात बुडला आणि गणूनी कपाटाचा दरवाजा हळूच उघडला.
 
गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html