
सध्या वेगवेगळ्या प्रकारचं भाषेशी संबंधित काम करीत असताना विना जोडाक्षर गोष्ट किंवा परिच्छेद लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने गोष्ट लिहिण्याचा केलेला हा एक प्रयत्न. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी ची ओळख तर करून देता येईलच पण सध्या मराठी शाळेतही शुद्ध स्वच्छ स्पष्ट लेखन वाचन करताना मुलं दिसून येत नाहीत. त्यांच्यासाठी हे सोप्या शब्दातील सोपे उतारे. या लहानश्या गोष्टीतून एक लहानसा गणू तुम्हाला भेटणार आहे. मला प्रकाश संतांचा लंपन मनापासून भावतो. तशाच भावविश्वात नेणारा हा गणू.
पहिल्या गोष्टीचं नाव आहे : कावळोबा
काल काय झालं, गणू सकाळी नेहमीपेक्षा जरा लवकरच उठला. दाराबाहेरून काव काव आवाज येत होता. आवाजाला कंटाळून किती वेळा बाहेर पाहिलं, झाडावर, फांदीवर कावळोबा तर कुठेच दिसले नाहीत. शेवटी गणू धावत पळत दाराबाहेर गेला. शोधाशोध करताना बघतो तर काय; कावळोबा एका झुडपात लपून बसलेले, जखम झालेली, पंख तुटलेला. कावळोबाचं हे रूप बघून गणूला खूप वाईट वाटलं, तो तडक घरात जाऊन कापूस घेऊन आला. जसजसा गणू कावळोबाकडे जात होता कावळोबा लांब लांब जात होता. मग गणूनी तो नाद सोडून दिला. हळूच एका वाटीत पाणी भरून वाटी दाराशी ठेवली आणि लपवलेले चार दाणे शेजारी ठेवले. आत जाऊन खिडकीशी उभा राहिला. कावळोबा दबकत दबकत लंगडतच तिथे पोहोचले. पाणी पिऊन दाणे खाऊन परत झुडूपाशी गेले. ते पाहून आपण थोडीशी तरी मदत केली असं वाटून गणूचा दिवसही खुशीत सुरु झाला.
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html
