विंदा करंदीकर यांच्या स्पर्शाची पालवी या ललित निबंधाच्या पुस्तकाविषयी…कितीतरी वेळा असं होतं की कोणी लिहिलेलं आहे यावर ते पटतं का आवडतं का हे अवलंबून असतं. विंदा करंदीकर यांच्या बाबतीत माझं काहीसं तसंच आहे… मुळातच त्यांच्या लेखनाविषयी आत्यंतिक आदर वाटतो त्यामुळे त्यांचे शब्द अभिजात मराठीचा पाया आहे असं वाटतं.

या पुस्तकात त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांतून लिहीलेले निबंध संकलित केलेले आहेत. प्रत्येक ललित निबंध वेगळ्या विषयावर नाही तर वेगळा विचार देणारा आहे, विचार करायला लावणारा आहे, अस्वस्थ करणारा, तर कधी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. त्यांचं लेखन सूक्ष्म निरीक्षण, तार्किक युक्तिवाद आणि कणखर भूमिका मांडतं, अतिशय खरे आणि तीव्र भावानुभव हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्यातल्या कवीची प्रतिभा ललित निबंधातून सुद्धा सतत जाणवत राहते. गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशावर अचानक कोसळलेलं संकट, त्यावर आपण सामान्य माणूस म्हणून काहीही करू शकत नाही त्यामुळे मनात अगतिकता, हतबलता, चीड होती… त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वेगवेगळे विचारतरंग कधी शांतता तर कधी वास्तवाची जाणीव देऊन गेलं.
आता या पुस्तकातील काही निबंधाविषयी…आतले आणि बाहेरचे… गाडीच्या आत जागा असलेला ते बाहेरुन आत येऊन मग आतला झालेला, दोन वेगवेगळ्या जागी असणारा दृष्टीकोन आणि त्यात सहजपणे होणारा बदल… ही प्रक्रिया सातत्याने होणं म्हणजे क्रांती!!… आणि मूळ प्रेरणा…एकच… जागा पाहिजे!!…परिस्थिती तीच आहे… आशयही तोच….खुर्च्यांनाही मने असतात… व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाने अनेक खुर्च्यांची बाजू ते मांडतात. खोडलेले शब्द… मध्ये पडदा पडलेला असताना त्या मागे काय…या उत्कंठेचं वर्णन आहे.
न चुकणारी माणसे उपहास आहे पण अतिशयोक्ती नाही…तोंडात व्याख्या, डोक्यात ज्ञानकोश आणि हातात फूट पट्टी अशी माणसं सहज दिसून येतात.. पण त्यांच्या आजच्या आणि उद्याच्या विचारात फरक नसतो…बदलाला वाव नसतो… अस्थिरता नसते…
चिंचा आणि आवळे… लहान मुलांच्या भावविश्वात आपण मोठी माणसे समोरच्या वास्तवाला सोडून मुद्दाम काल्पनिक, अतर्क्य, अद्भूत, अचाट गोष्टी का सांगतो त्याचं ते विश्लेषण करतात. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे…आपण गोष्ट सांगतो तेव्हा कल्पतरू ला चिंचा आवळे…नसतात… गोळ्या चॉकलेट… चेंडू…लाडू जिलब्या असतात. खरं तर मुलांना अवास्तव नाही तर वास्तव अधिक भावत असावं… आपल्याला वाटतं त्यांना कठीण आहे कळायला..पण ते कितीतरी सहजपणे गंभीर विचारही करू शकतात…
आणखी एक भूक हा असाच एक उत्तम निबंध, तो आहे मनातल्या वादळांच्या टीका, वाद, ते भांडण या निरोगी भूकेबद्दल. हत्ती आणि आंधळे… मध्ये डोळस माणसाची दृष्टी खरी की आंधळ्याची हा भेद आहे, वाटणे आणि असणे यातील सर्व सामान्य आणि विद्वत्तेचं द्वंद्व आहे… पुन्हा पुन्हा वाचावं असं बरंच काही आहे… त्यामुळे एकदा तरी आवर्जून वाचायला हवे…