आला रे आला व्होटिंग डे आला

चला चला चला आता व्होटिंगला चला 

रस्त्याला खड्डं नि वाहनाचं थवं

बिगी बिगी दादा थितं पोचायचं कसं 

नावाची चिट्टी हाये भलत्याच गावची

उभा हाई कोन तेचा पत्ताच न्हाईकी

इंजिनवाल्यानं परवा परचाराची म्होट्टी सभा घ्येतली

जेवनाबरुबर उत्सवाच्या मांडवाची आशास्नं बी दिली

बोलत सुटल्यात उरफाटी, मातीत माती बारामती

सपष्ट बोबडं, उल्टं न सुल्टं, बापलेक म्होटे करामती 

द्येशाचं मोदी, मोदीचं कमल, म्हणून शोधून राहिले

तवा अजित दादाचं फोटूच यायले

शाला, पुस्तक, ईस्पितळ,बस नि रासन

लाडकी भैन सुद्धा आता म्हनतं शासन

व्हाघाच्या धनुश्याचं बटन दाबू म्हनल्ये

तर आमच्या हितलं भाऊ मशाल घेऊन दिसले

भगवी मशाल घेऊन हिरवी फित मिरवतंय

असलं कसलं पामं ह्ये सार्खी पार्टी बदलतंय 

करनार कुनीबी काईच नै, सारा भार बोलन्यावर

एक पावसाळं उलटू द्या पुन्हा गाडं वळनावर

आता म्ह्या काय कराचं, मत तर द्यायचंय

सरकार थोडंच, मला शाणा नागरिक व्हायचंय

रडायचं हायेच पाच वरीस बटन कंचंबी दाबा 

सम्दे म्हना, कुट्ठं न्हीऊन ठिवलाय म्हाराष्ट्र माजा