सप्टेंबरमध्ये आजीची आठवण येतेच. त्यात पितृपंधरवडा , मग आजीला आवडायचं असं काय याचा विचार मनात आला आणि पुस्तक, कविता यांच्याबरोबरच दुर्गा बाईंची आठवण झाली. आजीला त्यांचा सहवास लाभला होता, त्यामुळे ती त्यांच्याविषयी अनेकदा सांगायचीही. तिला त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे अभ्यासू वृत्तीने पाहण्याचं आणि तितकंच रोजचं आयुष्य समरसून जगण्याचं फार कौतुक होतं, मनापासून आदर वाटायचा.
तिला त्यांच्या एखाद्या पुस्तकाचं वाचन केलेलं नक्की आवडलं असतं. त्यामुळे त्यांच्या ऋतुचक्र या पुस्तकातील काही भाग वाचुया असं ठरवलं. त्यातील प्रत्येक ललित निबंध उत्तम कलाकृती आहे, त्यामुळे आम्ही खरं तर त्यातलं काय वाचायचं आणि काय वगळायचं हा प्रश्नच होता. पण जमेल तसा त्या त्या महिन्याचा विशेष सांगेल असा निवडक भाग घेऊन आम्ही वाचन करत आहोत. यामध्ये त्यांनी १२ महिन्यांचं वर्णन करीत ऋतुचक्र उलगडून दाखवले आहे. चैत्राचे वाचन केले आहे सौ. सुमेधा केळकर यांनी.
चैत्र : सुमेधा केळकर
पुस्तक कोणतं वाचायच ते ठरलं. नवरात्री चे नऊ दिवस मी शेअर करेन असं ठरवून टाकलं. नवरात्री चे हळदी कुंकू, भोंडला, उपास असं काही जमेल का नाही माहीत नाही, पण असं एखादं पुस्तक सहज वाचायला नक्की जमवू. मग तेच जर सगळ्यांनी मिळून वाचलं तर एकत्र एक उपक्रम केल्याची गंमत आणि एक कायमची आठवण तयार होईल. कुठेतरी आजीचे बोल डोक्यात येत असतात ते अशा वेळी दिशा आणि आत्मविश्वास देतात. ती म्हणायची, ज्ञानेश्वरीत म्हंटलेलं आहे, देवाची आठवण पापणी लवताना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ मनापासून काढायची. मग उरलेला वेळ जे काम हातात घेताय ते मनापासून करा. त्या विचाराला अवलंबून एकेकजण वाचत गेलो.
दुर्गाबाईंच्या ऋतुचक्र पुस्तकातील चैत्र पाहिला, वसंतहृदय, कुसुमाकर, रूपरसगंधमय असा हा महिना. यानंतर वसंताच्या साखळीचा पुढचा महिना आहे वैशाख, त्याचं वाचन ऐकुया सौ. मंजूषा पेंडसे च्या आवाजात तर ज्या महिन्यात उन्हाळा पावसाळा हातात हात घालून एकत्र येताना आणि वारे व ढग एकमेकांशी हातमिळवणी करताना दिसतात त्या महिन्याचे वाचन केले आहे, सौ. रश्मी गाडगीळ यांनी.
वैशाख : सौ. मंजूषा पेंडसे
ज्येष्ठ : सौ. रश्मी गाडगीळ
एखादं पुस्तक जितके वेळा वाचू तितक्या वेळा आपल्याला त्यातून काही ना काही नवं सापडत जातं. हे पुस्तक म्हणजे तर विषयांची खाण आहे. यात मराठी महिने आणि ॠतू यांचा डोळसपणे केलेला अभ्यास तर आहेच. निसर्गातल्या ऊन, पाऊस, थंडी-वारा यामुळे जे ढोबळ बदल दिसून येतात ते आहेतच पण पक्ष्यांचे आवाज, त्यांची घरटी, सूक्ष्मजीव अन् किटकांचं विश्व कसं बदलतं ते दुर्गाबाई लिहीणार. अगदी एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष साध्य होईपर्यंत त्याचा छडा लावावा त्या प्रक्रियेने. त्यामुळे साहजिकच ही कलाकृती शास्त्र काट्याची कसोटी सहजतेने पार करताना दिसून येते.
निसर्गाची विकलावस्थेकडे चालू झालेली वाटचाल ज्येष्ठाशी जुळवून घेत वैशाख सृष्टीचा नूर सांभाळून धरतो. पांढरे ढग असणारी शुभ्र मेघमाला जागता पहारा ठेवते. ना कुठे गडगडाट ना चमचमाट. दोन चार थेंब जमिनीवर पडून मातीचा सुगंध दरवळला की हे थेंब दवाचे नसून पावसाचे असावेत असे समजावे. पण माणसाला आस असते ती काळ्याभोर ढगांची…जी पूर्ण होते आषाढाकडून आणि त्या कृष्णमेघांची शाल पांघरून ऊनपावसाचे गाणे गातो तो श्रावण. आषाढाचे वाचन केले आहे सुनीत पेंडसे यांनी आणि श्रावण ऐकू या सुस्मिता पेंडसेकडून.
आषाढ : सुनीत पेंडसे
श्रावण : सुस्मिता पेंडसे
बरं या पुस्तकात प्रत्येक महिन्यांचं वर्णन साधारणपणे ४-५ पानं तरी आहेच. मग हे सगळं वाचायचं… बापरे… म्हणजे वाचता येईल पण रेकॉर्ड करायचं कठीण आहे. त्यात एरवी मी हे असं काही वाचत असताना बाबा फक्त चालू दे… असा सहभाग घेतात. पण वाचताना म्हणाले, तू अतीच वाचतेय, त्यात लेकाने दुजोरा देत म्हणून … नेहमीच्या आवाजात वाचन. हातात वाक्य आलं की वाचतात त्याचा अर्थ समोरच्याला समजला पाहिजे असं कसं वाचता येईल या विचारात… त्यावर ही दोघे छे: असं काही वाचायची गरज नाही. त्यामुळे मुळात फार अभिनिवेश नसला तरी चांगलं वाटतं ऐकायला… उगाच काय…हा त्यांचा मुद्दा. असं एकुणात काय काय शिकायला मिळालेलं आहे या उपक्रमातून…आणखी एक … आजूबाजूचे आवाज नको यायला रेकॉर्ड करताना… किंवा शब्द चुकीचा आला म्हणून पुन्हा रेकॉर्ड करुया का…. हे सगळं घरगुती उपक्रमात माफ… त्यासाठी लगेच अस्वस्थ होण्याची गरज नाही…आता हे पण नवीन…
उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे खेचून नेणारा, इंद्रधनुष्यातून चराचराचं सौंदर्य दर्शविणारा श्रावण त्याच्या मागच्या पुढच्या ॠतूंना कवटाळून उभा असतो. झाडांवरील हिरवी पालवी, पानांची सळसळ, आणि फुलांच्या पायघड्या स्वागत करतात या सृष्टीचे संगोपन करणाऱ्या भाद्रपदाचं. या महिन्यांचं वर्णन ऐकूया बाबांच्या आवाजात.
भाद्रपद : अरुण केळकर
प्रत्येक महिन्याच्या वर्णनात ढग, वारा, ऊन, पाऊस, धुकं, तर आहेच, झाडाच्या खोडापासून, जुन्या नव्या पानांचे रंगही आहेत. चंद्र, सूर्य नि पृथ्वीच्या भ्रमणाचे निसर्गावर होणारे परिणाम सुद्धा आहेत. अश्विन महिन्याचं वाचन करताना एक प्रकर्षाने जाणवलं की अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यावरुन माणसाच्या जीवनाला राशींनी ओळख दिली. तशीच माणसाची ओळख या महिन्यातील दिसून येणार्या बदलातूनही होईल की. त्या त्या महिन्याचा निसर्ग आणि त्या महिन्यात जन्म झालेली व्यक्ती अगदी तशीच वैशिष्ट्ये घेऊन येतात… एक शक्ती असतेच म्हणजे जी हे घडवते, एखाद्याचे अस्तित्व त्याला का मिळालेलं आहे हे तर ठरवतेच पण ते कसे असेल हेही ठरवते.
भाद्रपदात इंद्रधनुष्य दिसू लागली की पावसाने आवरते घेतले असे समजावे. ढगांचा रंग आणि आकार कापसाच्या ढीगांसारखा दिसू लागतो. पावसाचा मारा कमी झाल्याने मातीचा सुगंध फुलांसह स्थिर राहतो, दरवळतो. पारिजातकाचा घमघमाट आता आश्विनातल्या रात्री येणार असे सांगू लागतात. आणि तसाच पूर्ततेची आस असणारा आश्विन येतो. सारी सृष्टी कर्ती सवरती झालेली असते. सुस्मिताने वाचलेल्या कार्तिक महिन्याबरोबर निसर्गही त्याची पूर्णत्वाकडून पुन्हा निर्मितीकडील वाटचालीसाठी कसा सज्ज झालेला असतो ते पाहूया.
आश्विन : सौ. नंदिता गाडगीळ
कार्तिक : सुस्मिता पेंडसे
या पुस्तकावर, दुर्गाबाईंच्या लेखनाबद्दल काय काय आणि कसं लिहायचं… लहान तोंडी मोठा घासच आहे. त्या वसंतह्रदय चैत्र, मेघश्याम आषाढ, पुष्पमंडित भाद्रपद अशी एका शब्दात पूर्ण महिन्याचे सार्थ वर्णनही करतात आणि कुठल्याशा खुरट्या झाडाच्या वाळक्या फांद्यांना मनोभंग झालेल्या खांदे वाकलेल्या माणसाच्या निर्जीव हातांची उपमा देतात तर कलात्मकतेने फांद्या वळवून उभ्या राहिलेल्या झाडाला कुशल नर्तकीची उपमा देतात. त्यांचा ललित निबंधातील एखादा परिच्छेदही इतका निरीक्षणाची उंची दाखवून जातो. कार्तिक महिन्यांचं वर्णन करणं चालू आहे, त्यात त्यांना आलेला एका दुपारच्या वेळेचा प्रसंग… सज्जात काहीशी हालचाल जाणवली, आजूबाजूला मुंग्या धरलेल्या. कुठल्याशा पक्ष्याने टाकलेल्या मांसाच्या तुकड्याला मुंग्या आल्या या समाजात त्या तिथे गेल्या… ते होते कुठल्याशा पाकोळीचे धड… आजूबाजूला साबुदाण्याच्या आकाराची अंडी चिकटलेली… मुंग्या झटकल्या तर ते चमत्कार व्हावा तशी ती पाकोळी उपडी वळली…तिचे शरीर स्पंदन पावत होते… शिल्लक अंड्यांची रांग या म्रृतवत पाकोळीने बाहेर टाकली अन् तिचे शरीर हळूहळू निस्तेज होत गेले… पुष्कळ कीटकांच्या माद्या नेहमी अंडी घातल्यानंतर मरण पावतात …जननाचा देखावा करुण, भयावह आणि विस्मयजनक असतो… हे आणि असे कितीतरी प्रसंग त्या चित्रासारखे रंगवतात आणि त्याचा अभ्यासपूर्ण पट आपल्यासमोर मांडतात.
त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या आणखी दोन महिन्यांचं वर्णन ऐकूया, मार्गशीर्षाचे वाचन केले आहे सौ. अर्चना बर्वे हिने आणि पौष ऐकूया साकेत खांबेटेच्या आवाजात.
मार्गशीर्ष : सौ. अर्चना बर्वे
पौष : साकेत खांबेटे
दुर्गाबाई भागवत त्यांच्या ‘विद्येच्या वाटेवर’ या लेखात म्हणतात, ज्ञानाच्या बाबतीत एक मौज असते की त्यात शिळेपणा नसतो नि नित्यनवीन ते ते अभ्यासू मनाला शिकायला मिळतच राहते. कुतूहल, जिज्ञासा सतत सत्याचा शोध घेत असते. ही विद्येची वाट जशी प्रकाशाची तशी गूढ अंधाराचीही असते. का, कोण, केव्हा हे प्रश्न, स्वतःच्या अनुभवावर आधारित, इतरांना आलेले अनुभवांनी संस्कारलेली पण मर्यादित दृष्टी घेऊन तो निघालेला असतो. या प्रश्नात सर्व अडथळ्यांची गर्दी जमलेली असते, नवं त्यातून मार्ग काढत जायचं असतं.
साहित्य, कला, शास्त्रीय दृष्टिकोनातून उजळलेले, ओघवतं तरीही धीरगंभीर असं निसर्गावर आधारित ललित लेखन आपल्यालाही क्षणभर का होईना खिडकीतून बाहेर नजर फिरवून एखादं झाड पान फुल… निरखून बघण्यासाठी उद्युक्त करतं, ऋतुचक्राचा खराखुरा अनुभव घेण्यासाठी. थंडीचा, शुष्कतेचा पण तालबद्ध असणारा पौष पुढे येणार्या वसंताच्या आगमनाची वर्दी देत असतो. पण निसर्गाच्या वाळक्या पसार्याला आखीव रेखीव रुप देण्याचे अन् रुक्षतेतून समरसतेची लाट निर्माण करण्याचे श्रेय फक्त माघाचे. या महिन्याचे वाचन केले आहे सौ. स्वरा कुलकर्णी हिने.
माघ : अरुणा पेंडसे
ऋतुंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे ही अजरामर साहित्यकृती. दुर्गाबाई निसर्गातील प्रत्येक घटकाच्या हालचालींना बारकाईने टिपून त्यातील बदल आणि त्या बदलांची पुनरावृत्ती, फिरून पुन्हा येतानाची नवी उर्मी, नवी आशा प्रत्येक लेखातून देत जातात. सृष्टीतील सौंदर्याचा आस्वाद घेत निसर्गाच्या चित्रलिपीचे धडे देतात.आपल्याला खर्या अर्थात निसर्गसाक्षर करतात.
आज या ऋतुचक्राचा अखेरचा टप्पा… नव्या चक्राच्या सुरुवातीचा टप्पा म्हणूया… माघातल्या काटक्या कुटक्या यक्षिणीची कांडी फिरवावी तसं सृष्टीचं रुप बदलून टाकतात. वसंतलक्ष्मीची नाजूक, नखरेल पावलं मखमली पर्णांकुरांवर पडून त्याचा पडसाद घुमू लागतो… फाल्गुनाचं आगमन होतं, या महिन्यांचं वर्णन ऐकूया अनघा पेंडसेच्या आवाजात.
फाल्गुन : अनघा पेंडसे
