जॅक लंडन या लेखकाचं कॉल ऑफ द वाईल्ड हे एक प्रसिद्ध पुस्तक. ही कथा आहे सांता क्लारा येथील जज मिलरच्या ‘बक’ नावाच्या एका कुत्र्याची. त्या जजचा माळी पैसे मिळवण्यासाठी बकचे अपहरण करतो आणि त्याला कुत्र्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याला विकतो. आणि बक एका अपरिचित जगात अनपेक्षितपणे फेकला जातो. कॅनडाच्या उत्तरेला सोन्याचा शोध लागल्याने बक सारख्या म्हणजे सेंट बर्नार्ड मिक्स जातीच्या कुत्र्यांना मागणी निर्माण झालेली असते. त्यामुळे दणकट बक सहजी विकला जातो.
ज्या क्षणी तो क्रेटमधून बाहेर पडतो त्या क्षणी त्याला नव्या विश्वाशी, न भागणाऱ्या भूकेशी, आणि चाबकाशी ओळख होते. दोन कॅनेडियन त्यांच्या स्ले डॉग टीमसाठी त्याला विकत घेतात. बर्फातून सामान आणि माणसांना वाहून नेण्याचे काम त्याला दिले जाते. ती गाडी वाहून नेण्याचे काम करणारी ही कुत्र्यांची टीम, त्यांत्यातही एक लीडर आहे, दिशा दाखवण्यात आणि त्यांना मिळणाऱ्या अन्नामध्ये स्वतःचा वाटा मिळवून भूक भागवून घेण्यात तो पटाईत आहे. बर्फ, इतर कुत्री, त्यांचा नेता, नेमकं मिळणारं अन्न आणि मोप मिळणारे चाबकाचे फटकारे… यांचं गणित शिकत जाणारा बक… एखाद्या कंपनीत नव्याने रुजू झालेल्या कर्मचार्यासारखा रंगवलेला आहे. तोही हळूहळू टक्के टोणपे खात ‘survival of the fittest’ ही उक्ती सार्थ करत त्या जगण्याच्या शर्यतीत नुसता टिकून राहत नाही तर जिंकतो सुद्धा… जरा विषयांतर करते, परवा एका लिंक्ड इन पोस्टमध्ये या पुस्तकावर आधारित चित्रपटाचा संदर्भ देत difference between a boss and a leader अशी क्लिपही पाहिली. …तर असा हा बक…leader!
काही काळानंतर तो पुन्हा एका कुटुंबाला विकला जातो, तो त्यांचा अनुभव आणखी वेगळा असतो. जे काही आजुबाजूला घडतंय ते फारसं काही हाती नसल्याने पाहात राहवं … अशी काहीशी अवस्था. पण तिथे त्या मालकाचे अंदाज अगदीच चुकतात, प्रवास चालू राहतो मात्र जवळचं अन्न संपू लागतं, बक आणि त्याच्या साथीदारांची शक्ती ही संपते, ज्याला अन्न पुरत नाही, त्याचा नैसर्गिक अथवा मालकाकडून मृत्यू… असं चक्र चालू होतं… बकचाही काळ येऊन ठेपतो पण तो वाचतो… जॉन थॉर्नटन या माणसामुळे वाचतो. हा माणूस त्याच्या गटाची वाट पाहत रस्त्यावरच कुठेशी थांबून आहे. त्याला पुढे जाण्याची घाई नाही अर्थातच त्यामुळे तो आणि बक यांचं एक नातं निर्माण होतं. आपला जीव वाचवणार्या या मालकासाठी बक वाट्टेल ते करायला तयार होतो, प्रसंगी तो मालकाचा जीव वाचवतो, त्याला पैसे मिळवण्यासाठी मदतही करतो. या मालकाकडून त्याला स्वातंत्र्य ही मिळते आणि आदरही. या स्वातंत्र्यातून तो सर्वात पहिल्यांदा जंगलात जातो त्याला त्याच्या अस्तित्वाची खरी ओळख होते. त्याच्या वंशजांची खात्री पटते. तो त्यांचाही नेता होतो, निष्ठावान साथीदार होतो. संपूर्ण कथा बक च्या दृष्टिकोनातून वर्णन केलेली आहे. माणुसकीची जाणीव झालेल्या एका प्राण्याला जेव्हा व्यवहारात वापरलं जातं तेव्हाची त्याची अवस्था आणि मानवनिर्मित जगातून अचानक बाहेर पडल्यावर निसर्गाशी जुळवून घेतानाचा त्याच्या अस्मितेचा शोध लेखक यशस्वीपणे मांडतो.
चित्रपटात मात्र काही बदल केलेले आहेत जे बघताना हिंदी चित्रपट पाहतोय की काय असा भास होऊ शकतो. बाकी पुस्तक वाचून किंवा चित्रपट पाहून माझं या समस्त जमातीबद्दलचं मत फारसं काही बदललेलं नाही. माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखं राहावं. त्यात कुत्री असली पाहिजेत असं नाही, त्यांनी जंगलात राहावं… सकाळी कुत्री फिरवणार्या आणि पूप स्कूपर न घेता उघड्यावर घाण करू देणार्या कुत्रे पालकांनी पण खरं तर ते नक्की कुत्र्यांना काय काय आणि कसं शिकवतात यावर एखादं तरी पुस्तक लिहिलं पाहिजे, कारण थोड्या वर्षांनी जेव्हा कुत्री वाचू लागतील तेव्हा त्यांना त्यांच्या या इतिहासाची साक्ष यातून मिळू शकेल. प्राणी बिणी आले की रस्ता क्रॉस करतो तसा या विषयाचा रस्ता जरा भरकटलेला आहे … असो!
