आता फक्त शेवटचे काही प्रयोग… रोहिणी हट्टंगडीना प्रत्यक्ष काम करताना पाहता येईल… मुक्ता बर्वे चे नाटक… इतकंही पुरेसं असतं… त्यामुळे नाही होय करत… मैत्रिणीने तिकीट काढून टाकलं… नाटकाबद्दल बरे-वाईट अनंत रिव्हू ऐकले वाचले होते तरी वेळात वेळ काढून नाटकाला गेलो हे कदाचित नाटकाचं यश असावं. कारण आताशा… कुठे आणि विकतचं दुखणं… म्हणून काही वाचा, पाहा, विचार करा…आपण काहीच करत नाही म्हणून आणि डोक्याला त्रास करून घ्या त्यापेक्षा न मागता दिसणाऱ्या बिनडोक रिल्स बघण्यातच वेळ जास्त जातो…असो…
साधारणपणे जे जगात चालू असतं, घडू शकणार असतं तेच विविध माध्यमातून दिसतं, हे नाटक गेली तीस वर्षे चालू आहे त्यामुळे ते काल..आज आणि उद्याचं हे नाटक. लग्न न करता जन्माला घातलेल्या तीन मुलींना सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कणखर बनवणारी आई, उच्च विद्याविभूषित लग्न होऊन २ वर्षे वयाच्या मुलीची आई असणारी मोठी मुलगी…ही विद्या… नवर्याने विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे दुखावते…घर सोडून निघून येते… मुलीची जॉईंट कस्टडी मिळावी यासाठी कोर्टात लढा देते… दुसरी मुलगी शिकलेली, नोकरी करणारी पण तिच्या नवर्याला नोकरी मिळवण्याची आणि टिकवण्याची क्षमता नाही… पण श्रीमंती बडेजावाची हौस… त्यामुळे ती पिचलेली पण तरीही आला दिवस आत्मविश्वासाने पुढे ढकलणारी… तिसरी धाकटी मुलगी… बंडखोर स्वभावाची, का…भरकटलेली, गोंधळलेली…तिला वाटते…ती आणि तिचे दोन मित्र यांचं एक कुटुंब असू शकतं…तर ह्या त्या चारचौघी… चारचौघीं सारखं जगता यावं म्हणून प्रयत्न करणार्या किंवा चारचौघींपेक्षा वेगळं सहज जगणाऱ्या…
रोहिणीताईंचे काम आवडले, स्वतःच्या निर्णयामुळे समोर आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाणारी स्त्री त्या उत्तम उभी करतात. मुक्ता बर्वे आणि विद्या वेगळ्या करता येत नाहीत. तिच्या मोनोलॉग विषयी भरपूर ऐकलं होतं… तो ती सुरेखच घेते. पण त्याहीपेक्षा दिग्दर्शकाने त्याला संवाद आणि स्टेजवरच्या हालचालींनी जो वेग दिला आहे तो अतिशय आवडला. पर्ण पेठेनी साकारलेलं धाकट्या बहिणीचं पात्र सूत्रधारासारखं नाटकाला पुढे नेतं, ते तिने ताकदीने केले आहे. प्रवाहाच्या विरोधात असणारा विचार मांडण्याचं धाडस करून ते पेलवून नेणं, विश्वासानं सादर करणं कठीण…त्यात प्रेक्षक तर चक्क तिच्या विचारांवर हसतानाही ऐकू आले… लोक या नाटकाबाबत … काळाच्या पुढचा विचार मांडणारे नाटक म्हणतात… हे यामुळेच असावं कदाचित. इतरही कलाकार आपापल्या भूमिका चोख बजावतात आणि सशक्त नाटक उभं करतात.
या नाटकाच्या निमित्ताने लिटील वुमेन कादंबरीवर आधारित २०१९ मध्ये आलेला चित्रपट आठवला. त्यातही चार जणी आहेत. पण या चारचौघी आणि त्या अगदी वेगळ्या आहेत. वडील युद्धावर गेलेले असताना आई तिच्या चार मुलींना मोठं करते. त्या या कथेतील चारचौघी. एक जण लेखिका, कथाभाग सुरू होतो तोच मुळी लेखिकेकडून… बाईचं सौंदर्यच फक्त पाहिलं जाई त्या काळात…दिवस रात्र लिखाण करून स्वतःचं अस्तित्व … स्वतःच्या बुद्धीच्या बळावर तिचं असणं सिद्ध करु बघणारं हे पात्र… तिच्या स्वभावामुळे अनेक आव्हानांनाही सामोरं जातं, दुसरी, अगदी साधी सरळ कुटुंबाची आवड असलेली, सामान्य अपेक्षा असणार्या बहिणीची, त्या बरोबर येणार्या अडचणींना तोंड देण्याची तयारी असते त्यामुळे तिचं आयुष्यही तसंच असतं… तिसरी चित्रकार …. परिस्थितीला तिला हव्या त्या दिशेने वळवण्याचीही कला आहे त्यामुळे ती अर्थातच पैसा, प्रेम, प्रतिष्ठा… मिळवताना दिसते. चौथी बहिण कमी बोलणारी, मागे राहणारी, पियानो वादक असते. तिच्या कलेमुळे ती तिच्या थोडक्या आयुष्यातही लक्षात राहते… याबरोबरच त्यांची आई, बाबा, भरपूर पैसा असणारी आत्या या भूमिकाही जुन्या काळातील स्त्री, पुरुष, युद्धाची पार्श्वभूमी, समाजासाठी जगण्याची प्रेरणा असे आपापले रंग घेऊन येतात. मूळ कथा आहे लुईसा मे अल्कॉट या लेखिकेची, १८६८ साली लिहीलेली, तसाच हा चित्रपटही त्या काळाची झलक देऊन जातो.
काळ बदलतोय, प्रश्न सुटतायत, समाजमनाच्या कक्षा का काय त्या रुंदावतायत… पण… अस्तित्वाचा, अस्मितेचा, बिनशर्त समानतेचा लढा… तो चालूच आहे…
