लेखिका सुधा मूर्ती … यांच्याविषयी काय आणि किती लिहावं तेवढं कमीच. मुळात इंजिनिअर मग टेल्को मध्ये काम करणारी पहिली महिला कर्मचारी, यशस्वी उद्योजकाची बायको, आत्मविश्वास असणारी आई, एका देशाच्या राष्ट्रपतीची सासू, एका एनजीओ ची संचालिका…या सगळ्या डगरींवर खंबीरपणे पाय रोवून उभी राहणारी व्यक्ती. अर्थातच अशा अनुभवसंपन्न माणसाकडे वाचनाची आवड आणि भाषेचं ज्ञान असेल तर किती ताकदीची कलाकृती निर्माण होऊ शकते याचं प्रतीक म्हणजे त्यांची पुस्तकं.
How I taught my grandmother to read and other stories या पुस्तकात लेखिकेने तिच्या अगदी लहानपणापासून ते मोठं होईपर्यंतचे अनुभव छोट्या छोट्या गोष्टींच्या रुपात लिहिले आहेत. तिच्या या अनुभवांच्या जगात आपणही अगदी सहज एकरुप होतो आणि वाचून झाल्यावर एखादा छानसा विचार आपलासा करतो.
तिनं तिच्या आज्जीला वाचायला शिकवलं तेव्हा मलाही आज्जी आणि कॉम्प्युटरची तोंड ओळख करून दिली ते आठवलं. आजीकडचा न संपणारा गोष्टींचा साठा, आपल्या आजूबाजूच्या जगाचा आपण भाग आहोत जाता जाता सुद्धा दुसऱ्याची मदत करणारी माझी आज्जी ही पण अगदी गोष्टीतल्या सारखीच. लेखिकेने शिक्षक म्हणून लिहिलेल्या गोष्टीसुद्धा सोप्या भाषेतल्या पण कानपिचक्या देणार्या. एक हुशार विद्यार्थीनी म्हणून एखाद्या कंपनीच्या संचालकाला पत्र लिहून त्यांना खडे बोल सुनावले खरे पण संस्था चालवत असताना प्रत्येकच वेळी स्त्री – पुरुष समानता प्रत्यक्ष पाळता येते का हा अनुभवही खराखुरा लिहीला आहे.
The upside down king, हे एक अतिशय वेगळं आणि सुंदर पुस्तक. या पुस्तकात राम आणि कृष्ण यांच्या गोष्टी आहेत. अर्थातच काही आपल्या सगळ्यांच्या माहितीतल्या, पण काही अगदी वेगळ्या.
गोष्टीवेल्हाळ हा शब्द या पुस्तकांचं वाचन करताना कितीदा खुणावत होता. जर सुधा मूर्तींच्या मुलाखती ऐकल्या असतील तर ही प्रसन्न सुधा आज्जीच आपल्याला गोष्टी सांगतेय असं वाटतं. इतकी बोलकी आणि सोपी भाषा, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या आणि वाचनाची ओढ लावणार्या गोष्टी असणारी ही पुस्तकं आवर्जून वाचावी अशी आहेत.
