कादंबरी/गोष्ट/रोजनिशी..काय म्हणू…..कथाभाग म्हणूया…
खानदेश, महालगाव या लहानग्या गावातून सोनकुळे आडनावाच्या एका विद्यार्थ्याने शहरात प्रवेश मिळवलेली आहे. मेरीट वर त्याला ही ऍडमिशन मिळाली आहे. त्याचबरोबर त्याला हॉस्टेल मध्ये प्रवेश सुद्धा मिळालेला आहे. उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि त्या बळावर प्रवेश मिळवलेला हा विद्यार्थी पहिल्यापासून आत्मविश्वास असणारा आहे. त्याला स्वतःची अशी मते आहेत. साधारणपणे आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्ती… पात्र त्याच्या आयुष्यात येतात… वाचकांना त्यांची जुजबी ओळख करून दिली जाते …पण बाकी कथा पुढे नेण्यासाठी किंवा मुख्य पात्राच्या विचार-आचारांवर ती प्रभाव टाकू शकत नाहीत. बाहेरगावाहून शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मुलांना शहरी वातावरणाचे, भाषेचे, हॉस्टेलचे, खानावळीचे, खिशातले पैसे वाचवता रोजचं आयुष्य जगतानाही किती आव्हानांना सामोरं जावं लागतं ते हे पात्र दाखवून जातं.
मुळात काही व्यक्ती तटस्थपणे जगाकडे बघू शकतात, स्वतंत्र विचार करू शकतात, केवळ सगळे करतात म्हणून एखादी गोष्ट न करता स्वतःला पटली, रुचली तर त्या मार्गाने जातात असा काहीसा या पात्राचा प्रवास. घरातून पैसा किंवा पाठिंबा नसताना केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण, करिअर किंवा एकंदरीतच का …कसं… चे अनंत प्रश्न सोडवत जाणारा हा सोनकुळे.
नवल ही कादंबरी अचानक हाती आली. बघ वाचून कशी आहे… … वाचताना… अगदी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतरचा अनुभवच असं नाही पण कुठल्याही टप्प्यावर एकट्याने घेतलेले अनुभव, तो प्रवास डोळ्यासमोर येऊन जाईल. अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण होतात… अगदी प्रमुख पात्राच्या भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दलसुद्धा… नक्की काय सांगायचं आहे इथून का सांगावे इथपर्यंत…पण हे परीक्षण नाही त्यामुळे फाटे फोडत नाही …ही पुस्तक – ओळखच!
अनेक छोटी छोटी वाक्यं … सहजपणे उदाहरण म्हणून येणारे तत्वज्ञान आणि मानसशास्त्रीय संज्ञांचे दाखले ही लेखनवैशिष्ट्ये.
