लेखिका – वीणा गवाणकर

‘एक होता कार्व्हर’ हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास अतिशय मार्मिकपणे रेखाटलेली १९८१ साली प्रथम प्रकाशित झालेली कादंबरी. अमेरिकेत, मिझुरी राज्यात, डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्व्हर या शेतकऱ्याकडे मेरी नावाच्या कृष्णवर्णीय स्त्रीने याला जन्म दिला. त्या काळात कृष्णवर्णीय नोकरांची चोरी करून त्यांना विकले जाई. तसे हे मायलेक एका टोळीने पळवले. शेतकऱ्याने त्यांचा तपास लावून त्यांना पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा मेरी नाही पण तिचं दोन वर्षांचं हे कृश बाळ तेवढं मिळालं तेही किंमत मोजून. या शेतकऱ्याकडे हे अशक्त मूल वाढलं आणि पुढे त्याच नावाने ओळखलं गेलं. या पोराला किती वर्षे बोलताही येत नव्हतं, पण त्याची ओढ निराळीच होती. रानावनातील झाडझुडुपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे यात तो रमत होता‌. त्याने एकदा चक्क पालापाचोला, गवत, दोरा आणि सूत याचा वापरून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं कि सुझनबाईंना – शेतकऱ्याची बायकोला, लोकांना शपथ घेऊन सांगावं लागायचं की हे आमच्या मुक्या पोरानेच बनवलं आहे. त्याला बागेतील फुले, झाडांची वाढ यांची विलक्षण समज होती. त्या झाडांची जागा बदलणे, त्यांना सूर्यप्रकाश देणे, खतपाणी घालणे असं करून तो कोणाचीही बाग फुलवून द्यायचा. डायमंड ग्रोव्ह मधला तो छोटा आणि कुशल माळी होता.

थोडा मोठा झाल्यांनतर त्याने कार्व्हर कुटुंबाच्या मदतीने निग्रो मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला. आता निग्रो समाज गुलाम राहिला नव्हता, स्वतंत्र झाला होता. निओशीत गेल्यानंतर जॉर्ज घरोघर फिरून मिळतील ती कामे करून शिकला. तिथे त्यांची ओळख जॉन मार्टिन यांच्याशी झाली. ते त्याला आपल्या घरी राहायला घेऊन गेले. तिथेही तो स्वयंपाकापासून ते बागेपर्यंत सगळी कामे करायचा आणि शिक्षण घ्यायचा. त्याने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेताना, निग्रो असल्यामुळे एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यानंतर सिंप्सन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. हे सारे त्याने कष्टाने आणि जिद्दीने केले. एखाद्याच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पनासुद्धा भयंकर वाटावं असं बालपण, खरं तर आयुष्यच त्यांच्या वाट्याला आलं. पण देव असतो म्हणतात तशी काही माणसं त्यांना भेटली आणि ते जिवंत राहू शकले, शिकू शकले, परिस्थितीवर मात करू शकले.

शिक्षण संपवून जॉर्ज कार्व्हर त्याच कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आर्थिक स्थिती सुधारली होती. सुसंपन्न राज्यातील सुशिक्षित लोक त्यांना शेती विषेशज्ञ म्हणून ओळखू लागले होते. स्वतंत्र झालेला असला तरी निग्रो समाज मात्र दिशाहीन होता. मिळालेलं स्वातंत्र्य वापरायचं कसं याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याच काळात अलाबामामध्ये बुकर टी. वॉशिंग्टन या कृष्णवर्णीय शिक्षणतज्ज्ञाने निग्रो लोकांसाठी शिक्षणसंस्था स्थापन केली. कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या या राज्यात त्या पिकावर कीड पडल्याने अचानक संकट कोसळलेलं होतं. अतीश्रीमंत शेतकरीसुद्धा कंगाल होईल की काय अशा परिस्थितीत होता. वॉशिंग्टन यांनी आपल्या समाजबांधवांसाठी कार्व्हरना या संस्थेत काम करावे म्हणून पाचारण केले. सम्रृद्धी सहज बाजूला ठेवून कार्व्हर टस्कीगी संस्थेत रुजू झाले ते शेतीविषयक विभागाचे संचालक म्हणून.

त्या परिसराची अवस्था बिकट होती, तेच त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले. तेथील विध्यार्थ्यांना हाताशी घेऊन दिवसरात्र मेहनत घेऊन त्यांनी तिथे विविध प्रयोग केले. अनेक वर्षे जिथे कापसाचं पीक घेतलं जात होते तिथे त्यांनी भुईमूग लावून दाखवून जमिनीची पोत कशी सुधारेल याचं ज्ञान दिले. त्याच भुईमुगापासून त्यांनी जवळपास ३०० पदार्थ बनवून दाखवले. जिथे फक्त कापसाचे पीक घेतले जायचे तिथे त्यांनी रताळे लावून त्यापासून सव्वाशेपेक्षा जास्त पदार्थ बनवून दाखवले.मातीचा कस टिकवून ठेवण्यासाठी आंतरपीक घेणे, घेतलेल्या पिकांचे उपयोग आणि विक्री हे सारे केले, अगदी हातगाडीवर सामान टाकून गावोगाव फिरून शिक्षण, संशोधन आणि स्वच्छतेची माहिती देणेसुद्धा जिद्दीने केले, न थकता केले. स्वतंत्र असला तरी निग्रो समाज मानहानी सहन करीतच होता. कार्व्हर सुद्धा यातून कधी सुटले नाहीत. त्यांचा लढा त्यांनी बुद्धी वादाने दिला.

व्यक्तिचे मोठेपण केवळ त्याच्या बाह्यसौन्दर्यावर अवलंबून नसते. त्याच्या अंगी असलेल्या गुणांवर व प्रतिभेवर असते हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिलं. त्यांनी अर्थार्जनापेक्षा ज्ञानार्जनाला अधिक महत्व दिले. केवळ सव्वाशे डॉलर एवढाच पगार घेतला. आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातील किती तरी वस्तू आजही बाजारात विकल्या जातात. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या पर्याय आहेत ते नैसर्गिक साधनसंपत्तीचा संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा हेच.

कधीही केव्हाही साध्या सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक हाती घ्यावे. आयुष्य कठीण असतानाही एखादा त्याच्या कष्टाने, चिकाटीने, आणि सतत शिकण्याची धडपडीने अभ्यासाने परिस्थितीवर मात करून पुढे जाऊ शकतो, इतिहास रचू शकतो. काही न मागता समाजासाठी जगतो. चांगला माणूस घडवायचा तर प्रेरणादायी पुस्तक म्हणून किंवा सुजाण नागरिक कसा असावा याचा आदर्श म्हणून हे पुस्तक अवश्य वाचावे.