वीणा गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे व्यक्तीचित्रण.

आई-वडील मिशनरी म्हणून भारतात काम करत होते.. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी दक्षिण भारतात काम. तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवणे आणि होता होईल तो धर्माचा प्रसार करणे हा त्यांचा हेतू. आयडाही अगदी लहान असताना त्यांच्याबरोबर भारतात होती. पण प्रचंड दुष्काळ पडला आणि या दाम्पत्याने तिला अमेरिकेत पाठवून दिले. मूलभूत शिक्षण झाल्यानंतर आईची तब्येत बरी नाही म्हणून तिला भेटायला ही पुन्हा भारतात आली. खरं तर पुन्हा भारतात अजिबात न थांबण्यासाठी. तिच्या डोळ्यासमोरून भारतातील दैन्यावस्थेचं, अस्वच्छतेचं चित्र फार पूर्वीपासून कोरले गेलेलं. पण त्या वेळी… एका रुग्ण स्त्री, ती-समोर पडदा धरलेला आणि तसं तिचं निदान करायचं, अगदी बाळंतपण सुद्धा सुईणीला सुचना देत करायचं ही परिस्थिती… आयडा सुद्धा डॉक्टर असावी या अंदाजाने तिला बोलवलं गेलं होतं. ती आर्ट शिकून आलेली… मी येऊन उपयोग नाही, बाबांना घेऊन येते म्हणाली…पण स्त्रियांवर उपचार करण्यासाठी पुरुषांना यासाठी बंधन… तिने अशाप्रकारे केवळ स्त्री डॉक्टर अभावी झालेले तीन मृत्यू पाहिले आणि आयुष्यात पुढे काय करायचं याचा विचार करून पुन्हा अमेरिकेत जाऊन डॉक्टर बनून परत भारतात येऊन लोकसेवा करण्याचे ठरवले.

पुन्हा नव्या जोमाने शास्त्र विषयाची नुसती ओळख नाही तर वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुरेसं ज्ञान मिळवणं हे कठीण होते पण त्यांनी ते साध्य केले. त्या काळात भारतात परत येऊन त्या जेव्हा सेवा पुरवू लागल्या तेव्हा त्यांना अनेक अंधश्रद्धांना तोंड देत उपाय करावे लागले, लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष स्वतः ती गोष्ट करुन दाखवावी लागे. अपयश आणि त्यामुळे होणारी कुप्रसिध्दीही टळली नाही. पण त्यांच्या हाताचा गुण, स्वतः बारीक सारीक सगळ्या कामांना तयार राहून त्यांचे नाव वेलूरमध्ये सर्वश्रुत झाले. भारतात सर्व सोयी असणारे हॉस्पिटल, महिलांना स्वतः डॉक्टर बनता यावे यासाठी शिक्षणसंस्था उभी करण्यासाठी अमेरिकेतून वेळोवेळी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. वैद्यकीय कॉलेज, नर्सिंग कॉलेज, दवाखाने उभे करताना त्यांना आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले पण कष्ट करण्याची तयारी असलेल्या आणि रिसोर्सफुल व्यक्तीला असाध्य असं काही नसतं.

डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याचं व्रत घेऊन त्यांनी ते आयुष्यभर टाळलं. गावोगावी फिरून अगदी रस्त्याच्या कडेने थांबून रूग्णांना औषधोपचार केले, हाताखाली स्वतःसारखीच ध्येय वादी फळी उभी केली.

आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे हे ठरवण्यातच कितीदा आयुष्य खर्ची पडतो. पण काहींना मात्र ते वेळेवर समजते आणि मग ते त्या आयुष्याचा यथोचित वापर करतात.