आहे आणि नाही यांच्यामध्ये बरेच काही घडते 

झाडावरून गळलेले पिकले पान पण पुरते…

ओळख कुठे व्हावी लागते मानापमानासाठी

काना मात्रा वेलांटी ही आणू शकते आठी…

चूक आणि बरोबर यांच्यात असते अंतर मोठे

माझेच खरे म्हटले की फुटत राहतात फाटे…

सूर नसतातच जुळायचे जरी प्रयत्न केला ढीग

रूसवेफुगवे धरून बसतात मनाची कवाडं धीट…

हा हा म्हणता डोळ्यासमोर दूध ऊतू जाते

हेवेदावे रागलोभ देणे सव्याज वसूल होते…

आहे काय नि नाही काय, त्यांचे काय जाते

मी आणि तू चे भांडण तेवढे सतत चालू राहते…