जे.के. रोलिंग चं हॅरी पॉटर वाचून झाल्यावर जादुई जगतातील अजून काही वाचावं का नाही…हे नक्की कोडं आहे…पण तरीही… जॉनाथन स्ट्राऊड याचं ऍम्युलेट ऑफ समरकंड हातात आलं… आणि तेही तितकंच रंजक असल्याचं जाणवलं.
या पुस्तकात जादुई जग हे सामान्य जगाचा एक भाग आहे इतकंच नव्हे तर ते कुठेतरी ब्रिटनचा कारभारही चालवत आहे. या जादुगारांच्या जगात पुढची पिढी तयार होते ती अनोळखी मुलांचा सांभाळ करीत. या जगातही जादूचे शिक्षण देणारी पुस्तके आहेत पण त्यांची वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विकणारी दुकानेही आहेत.
हा कथेतील प्रमुख पात्रे आहेत नॅथॅनियल आणि बार्टेमिअस. नॅथॅनियल या मुलाला सहा वर्षांचा असताना जादूगार आर्थर अंडरवुडकडे आणले जाते, जादूगार विश्वातील त्याचं शिक्षण आता तिथे होणार आहे. कथेची सुरुवात करतो तो बार्टेमिअस, हा बार्टेमिअस एक ५००० वर्षांपासूनचं चांगलं-वाईट जग बघितलेला जिनी आहे, बरोबर, जिनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अल्लादिन चा जादुई चिराग आणि त्याच्यासमोर हात जोडून “क्या हुकुम है मेरे आकाह” म्हणणारा निळ्या रंगाचा जिनी येतो. हे बार्टेमिअस भाऊ पण त्यांच्याच जाती जमातीतील असावेत, माझं त्याबद्दल चं बरंच वाचन कमी असल्याचं बार्टेमिअस ने लिहिलेल्या नोट्स वरुन जाणवलं. हं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या पुस्तकात, हा बार्टेमिअस त्याच्या बोलण्यातील जे जे संदर्भ आपल्याला समजणार नाहीत असे त्याला वाटते त्याच्या नोट्स खाली वाचायला सांगतो. (करेक्ट, मधून अधून पीपीटी खाली असतात त्या नोट्स किंवा किंडल वर शब्दाचा अर्थ येतो तसं). तर, हा जिनी हुशार, शक्तीशाली, जादू करू शकणारा, रूप बदलू शकणारा वगैरे आहे. ही दोन्ही पात्र अतिशय रंजक पद्धतीने भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यातून आपली सफर घडवतात. नॅथॅनियल कोणत्या कारणासाठी हे ऍम्युलेट किंवा ताबीज चोरतो, त्यामुळे त्याच्यावर कोणते जीवघेणे संकट येते, त्याच्या माणसांना काय भोगावे लागते आणि यातून तो स्वत: कोणत्या प्रकारचा जादूगार म्हणून तयार होतो याची ही गोष्ट.
कथेमध्ये बार्टेमिअस ज्या प्रकारे नॅथॅनियल किंवा एकूणच जादुई जगाविषयी जे बोलतो ते कथन वाचताना मजा येते आणि उत्कंठाही वाढते. या पुस्तकातील काही संदर्भ हॅरी पॉटरच्या पुस्तकांत वाचल्या-पाहिल्यासारखे वाटतात. पण ते जादूचं जग संपूर्ण वेगळं आहे. ह्यात येणारे मेणबत्त्या, जादू करताना आखालेली वर्तुळे असे कही गूढ संदर्भ त्यात नाहीत. गोष्टीतही साम्य नाही. दोन्ही मध्ये हॅरी पॉटर नक्कीच अधिक उजवे आहे. पण कधी तरी बदल म्हणून हे ठीक. बार्टेमिअस ट्रायॉलॉजी अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत…पण तूर्तास तरी ती वाचायला घेतलीच पाहिजेत असं नाही… मुलांनी जरूर वाचावं असं आहे आणि वाचलं तरीही त्यापुढचे भाग लगेच मागणार नाहीत त्यामुळे पालकांसाठीही उत्तम!
