बोक्या .. नावातच काहीतरी उचापती किंवा मस्ती करणारा हा मुलगा असणार हे आलंच. दिलीप प्रभावळकर लेखणीतून अवतरलेल्या या पात्राबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. हे पात्र शेंडेफळ, दंगेखोर, जरा आगाऊच पण हुशार, धाडसी, लोकांना मदत करण्यासाठी धावून जाणारा आणि नितांत लाघवी, संवेदनशीलही आहे.
मित्राने पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेताना गोंधळ घालणारा बोक्या, आईच्या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन तिथल्या पेशंटना हवं नको ते बघणारा, दादाच्या नाटकासाठी अचानक गायब झालेल्या पात्रांची जागा भरून काढण्यासाठी चक्क बाबांना उभा करणारा, आजारी असतानाही मित्राला आपल्या जागेवर पडून राहायचं पटवून स्वतः शाळेत भाषणाला हजर राहणारा, समोरच्या घरातल्या बेलवंडींचा अमेरिकेत राहणारा नातू देवेन येणार नाही असे कळल्यावर त्याच्या जागेवर दादाला उभा करणारा, नऊ डिगऱ्या असणाऱ्या चावरेंनी पळवून खोलीत बंद करून ठेवलेल्या मुलाला वाचवणारा बोक्या .. ह्या आणि अशा कितीतरी सुरेख गोष्टी या पुस्तकात आहेत.
बरं हा बोक्या जितका लहानाचा आहे तितकाच तो मोठ्यांचाही आहे. पोट धरून हसायला लावणारा, टचकन डोळ्यात पाणी आणून अंतर्मुख करणारा, माणुसकी, निरागसता कुठे तरी जिवंत आहे याची जाणीव करून देणारा, तुडुंब कल्पनांचे नवनवे बॉम्बस्फोट घडवून आणणारा असा हा बोक्या. त्याच्या बरोबर आहेत त्याचे आई-बाबा, दादा, त्याची बेस्ट फ्रेंड त्याची आज्जी, त्याचे त्याच्याच सारखे डोक्यामध्ये हजारो भानगडी आणि क्लुप्त्या शिजवणारे भन्नाट मित्र. आपण या सगळ्यांना रेडियोवर, टीव्हीवर भेटलेलो आहोत, त्याचा सिनेमा ही येऊन गेलाय.
मी शाळेत असताना वाचलेला बोक्या आत्ता ही वाचताना तितकाच भावला, ते वाचता वाचता शाळेत केलेल्या बोक्यापणाचे किस्से माझ्या मुलांना सांगतानाही प्रचंड मजा आली, शाळेची फार आठवण आली. अरे, आमच्या शाळेत एकदा मोठ्ठ्या पटांगणात एकाच फरशीवर लाल पाय उमटले होते, ते कसे कुठून आले त्याचा आम्ही शोध कसा लावला… शेजारच्या शाळेत असलेल्या पुतळ्याचे डोळे रात्री सात नंतर फिरताना दिसतात हे कळल्यावर एकदा मुद्दाम शाळेनंतर थांबून त्या पुतळ्याचे डोळे बघण्याचा प्लान कसा आखला होता…अर्थात तो साध्य झाला नाहीच पण प्रयत्न मात्र आम्ही खूप केले. हाकामारी नावाचं वादळ आणि त्यामुळे दिसेल त्या प्रत्येक दरवाजावर मारलेली फुली ही गोष्ट ऐकताना तर आज पण अंगावर काटा येऊन गेला. शाळेतल्या एका सरांना नक्की खरे केस आहेत की टोप याचा ही छडा लावण्यासाठी आम्ही त्यात कितीतरी विनोद घडवले. एक बाई अतिशय कंटाळवाणा तास घ्यायच्या मग त्या वर्गात येण्यापूर्वी आम्ही एक विशिष्ट खिडकी उघडून ठेवायचो, त्या खिडकीतून समोरच्या इमारतीवर सुशोभन म्हणून लावलेली समई उन्हाने चमकायची आणि बाई हैराण होऊन त्यांचा किमान दहा-बारा मिनिटे वेळ खिडकी बंद करणे, त्यावर चर्चा आणि मग वर्ग शांत करणे यात जायचा….आम्ही खुश! शाळेत चिंचेचं झाड होतं, त्या झाडाच्या चिंचा पाडायला आणि खायला कोणाच्याही परवानगी ची गरज नव्हती, हे आणि असं सगळं काय काय आठवलं. शाळेतली हस्तलिखितं, ग्रंथालयात बसून केलेली अनेक प्रोजेक्ट्स, अभंग आणि वर्ग-स्वच्छतेच्या स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी केलेली तयारी, नाटकाची तालीम, एकत्र केलेला अभ्यास, असं बरंच काही…. शाळा भारी होती आमची. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी, चुकलं तर शिक्षा करणारी आणि प्रत्येक लहान मोठ्या यशाचं भरभरून कौतुक करणारी. आता पालक म्हणून वाटतं मुलांची जरा जास्तच काळजी घेतो का आपण…. घरातली बाहेरची सगळीच नाती कोरडी होत चालली आहेत का….
पण मग मुलं येऊन सांगतात की जरा शेजारच्या काकूंची परवानगी घेऊन आलो, म्हणजे त्या घरी नसताना आमचा क्रिकेट बॉल त्यांच्या घरात गेला तर गेटवरून आत जाऊन घेऊन आलो तर चालेल का…घ्या म्हणाल्या त्या… असलं काही किंवा आम्ही आमच्या शाळेत पोकेमॉन कार्ड चोरी होत आहेत त्याचा शोध लावायला एक डिटेक्टव्ह ऑर्गनायझेशन चालू केली होती आणि त्यातून आम्ही तो मुलगा सापडवला आणि ती हरवलेली कार्ड पण मिळवली, वर्गातल्या कुठल्याशा गरीब मुलाला घरून कसलीच मदत नाही त्यामुळे अभ्यास मागे आहे, इंग्रजी धड वाचता येत नाही पण अगं आई, तो रामाची भजनं तोंडपाठ म्हणत होता परवा भेंड्या खेळताना…एवढं ऐकलं की मुलांतील संवेदनशीलता टिकवून ठेवता आली म्हणायची असं वाटतं आणि बाकी सब ठीक? बस चल रहा है कडून सब सही चल रहा है असं म्हणता येतं.
दहा भागांतून हां बोक्या भेटतो. तो कित्ती काय काय करतो ते नक्की वाचा!
मराठी, इंग्रजी कोणत्याही भाषेत शिकणाऱ्या मुलांना सहज वाचता येईल, समजेल अशी भाषा आणि जसा हवा तसा आशय असलेली ही पुस्तके अवश्य वाचा.
