परवा कथेच्या पुस्तकाचा शोध घेत असताना हे पुस्तक दिसलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी कथा. कवी कुसुमाग्रज आणि नटसम्राटचे नाटककार शिरवाडकर या पुस्तकात भेटले ते भलतेच निवांत लेखक म्हणून. साधी सरळ भाषा तितकेच साधे सरळ विनोद.
या पुस्तकात पंधरा वेगवेगळ्या कथा आहेत, विषयही वेगवेगळे. हो, अगदी साधे सोपे. मुळात उत्कृष्ट लेखन असणार्या व्यक्तीने निबंध लिहिला तरी तो वाचनीय होतोच तसं काहीसं झालं हे पुस्तक वाचताना.
कामयाब ही पहिलीच कथा, चक्क श्वान संवादातून फुलत जाते. पहिले चुंबन ही कथा पत्रांतून संवाद साधते. राजकन्या आणि दासी मध्ये राज्य क्रांती उपहासाने मांडलेली आहे. अनुस्वार आणि अनंताची ट्रॅजेडी या कथांत ते मराठी भाषेचा अभ्यास आणि कवीची प्रतिभेला वेळ देताना वास्तवाशी होणारी झटापट खुसखुशीतपणे समोर ठेवतात. अभागी अबला ही कथा चित्रपट क्षेत्राला श्वास मानून त्याला कोळून प्यायलेल्या एका दिग्दर्शकाच्या उठाठेवीची आहे.
चोर सापडला तर, प्रेम आणि मांजर, भामानिवासातील एक प्रसंग, शमा परवाना, भगिनी प्रेम, चंपारमणाची मुले, एक ती आणि सात ते या साऱ्या प्रेम प्रकरणातून उभ्या राहिलेल्या विनोदी कथा. आजकालच्या भाषेत थोड्या फार मसालेदार बनवून पेश केलेल्या एका वाक्यातील कथा.
पुस्तक वाचताना डोक्याला त्रास तर होत नाहीच उलट चार घटका निखळ आनंद मिळतो. या या लेखकाने एका विशिष्ट पद्धतीने लिहीलं तरच ते लिखाण चांगलं असलं काही डोक्यात न ठेवता हे पुस्तक वाचलं तर केवळ मजा घेता येईल. नव्याने मराठी भाषेचा अभ्यास करणार्यांना हलकं फुलकं वाचन म्हणून अवश्य वाचावं असं पुस्तक.
