पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रगत प्राणी कोण? तर मानव, असे आपण म्हणतो. पण ह्यामागचं कारण काय बरं असेल? माणसाच्या शरीराची विशिष्ट ठेवण, त्याचा हाताचा अंगठा, की त्याचा मेंदू, अर्थात या सर्व बाबी पण त्याच्या प्रगतीसाठी नितांत आवश्यक गोष्ट होती ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता! मग त्याचा चाकाचा शोध असो, शिकारीच्या शस्त्रांचा वा सांकेतिक भाषेचा, मानवाच्या ह्या प्रवासात त्याच्या बुद्धिमत्तेचा खूप मोठा वाटा आहे. मानवाच्या प्रगतीचा ओघ सतत चालू राहिला. त्याने त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक शास्त्रांचा अभ्यास केला, अनेकविध शोध लावले आणि तंत्रज्ञान विकसित केले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाने आपली कामे यंत्रांकडून करून घेण्यास सुरुवात केली आणि प्रगतीचा वेग अजूनच वाढवला. यंत्रे विकसित झाली पण ही यंत्रे अस्तित्वात येत होती ती मानवी बुद्धिमत्तेच्या आधारानेच. मुळात विचार करण्याचे, एखादी समस्या सोडवण्याचे काम अजूनही माणूस त्याच्या बुद्धीनेच करीत आहे. ह्याच संदर्भात एक विचार पुढे आला, की हे विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं कामसुद्धा आपण यंत्रांकडून करून घेऊ शकतो का? यंत्रे मानवासारखा विचार करू शकतील का? या विचारांती एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली. ती म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एक आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स)!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश गणितज्ञ ऍलन टय़ुरिंग यांनी एका यंत्राच्या साह्याने जर्मन फौजांच्या सांकेतिक भाषेतील संदेशांचा अर्थ शोधण्याचे महत्त्वाचे काम केले. यातूनच पुढे त्यांनी संगणक मानवासारखा विचार करू शकतात का? याचा शोध घेताना यंत्रांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी टय़ुरिंग टेस्ट विकसित केली. या टेस्टमध्ये एक माणूस एका बंद दाराआडून संगणकाला आणि दुसऱ्या एका माणसाला लिखित स्वरूपात काही प्रश्न विचारतो. प्रश्नकर्त्याला केवळ त्याला मिळालेल्या लिखित उत्तरावरून संगणक कोण आणि माणूस कोण, हे ओळखायचे असते. जर प्रश्नकर्ता त्या दोघांना ओळखू शकला नाही, तर याचा अर्थ संगणक माणसासारखा विचार करून उत्तर देतो आहे असा होईल आणि तो संगणक ही कृत्रिम बुद्धिमत्तेची परीक्षा पास होईल. जरी या परीक्षेच्या काही मर्यादा होत्या, तरीही मानवी बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, हे माहिती नसतानाही संगणकाची बुद्धिमत्ता मोजण्याची ही व्यावहारिक पद्धत आजही महत्त्वपूर्ण मानली जाते. १९५६ साली डार्टमाऊथ येथे झालेल्या एका कार्यशाळेत स्टॅनफर्ड संशोधक जॉन मॅकार्थी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) हा शब्द सर्वप्रथम वापरला.
आता या संकल्पनेच्या व्याख्या पाहू;
मानवी बुद्धिमत्ता: आपल्या आजूबाजूचे वातावरण समजावून घेणे, तेथील गोष्टींचा परस्परसंबंध लावणे, विचार करणे, त्यातून शिकणे आणि या सर्वाचा वापर करून योग्य तो निर्णय घेऊन कृती करण्यासाठी लागते ती मानवी बुद्धिमत्ता.
कृत्रिम बुद्धिमत्ता: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धीला ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या सर्व गोष्टी एखाद्या यंत्राने/ संगणकाने करणे.
या संकल्पनांमधील काही मूलभूत फरक खालीलप्रमाणे;
स्वरुप:
मानव त्याच्या अनुभवांमधून शिकतो आणि विविध संज्ञानात्मक (cognitive) कार्ये सहजी पार पाडतो याउलट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर चालणारे यंत्र मानवी विचार प्रक्रिया आणि मानवाच्या तर्कशुद्ध वर्तनासारखे कार्य करते.
कार्य:
मानवी मेंदूआठवणी, अनुभव, विचार आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याच्या त्याच्या क्षमतेसह कार्य करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर चालणारे यंत्र उपलब्ध माहिती (डेटाबेस) आणि यंत्राच्या कार्यप्रणालीला दिलेल्या सूचनांनुसार कार्य करते.
शिकण्याची क्षमता:
मानवी बुद्धीला वेगवेगळ्या परिस्थिती आणि घटनांचा सामना करावा लागतो. मानवी जीवन हे अनुभवणे, शिकणे, प्रयोग करून बघणेयातून घडत जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता ‘विचार’ करू शकत नाही. कोणतीही संज्ञानात्मक(cognitive) कृती करण्यासाठी यंत्राला प्रचंड प्रमाणात माहि ती आणि अविरतपणे चालणाऱ्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
वेगमर्यादा:
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनेयंत्राला एका सेकंदापेक्षा कमी वेळात विविध समस्या सोडवता येऊ शकतात. परंतु प्रत्यक्ष मानवाला एखादी समस्या समजून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठीयंत्रापेक्षा अधिक वेळ लागतो. उदा. एखादे यंत्र अनेक वैद्यकीय अडचणींचेकाही क्षणात नि दान करू शकतो याउलट एखादा डॉक्टर निदान करण्यासाठी किमान काही मिनिटे घेतो.
पूर्वग्रह:
मानवी बुद्धिमत्तेमध्ये निवडी आणि अगदी निर्णयांबद्दलही पूर्वग्रह असूशकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्राच्या कामात पूर्वग्रह नसतो.
अचूकता:
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अचूकतेचा दर मानवांपेक्षा खूप जास्त असतो.
काम करण्याची क्षमता:
मानवी मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रे अथकपणे काम करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी यंत्रे नीरस आणि एकसुरी कामे चांगल्याप्रकारे करु शकतात. या यंत्रांना पूर्णत: माहितीवर अवलंबून राहावे लागते. यंत्रे कारण आणि परिणाम समजू शकत नाहीत. मानवी मेंदूमात्र अनुभव, तर्क करण्याची क्षमता आणि विशिष्ट परिस्थिती समजून घेण्याची क्षमता यांचा एकत्रितपणे वापर करू शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य
आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक विकसित होत आहे. मानवी बुद्धिमत्ता एआय प्रणालींना प्रशिक्षित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालक विरहित गाडी चालवणे, व्हॅक्यूम क्लिनर रोबोट्स, नैसर्गिक भाषा किंवा प्रतिमेवर प्रक्रिया करणे यासारखे अनेक यशस्वी प्रयोग केले जात आहेत. ‘यंत्रे विचार करू शकतात का?’ हा प्रश्न कायमच वेधक राहील. संशोधक अजूनही मानवाच्या अद्वितीय विचार प्रक्रियेचा शोध घेत आहेत त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य मानवी बुद्धिमत्तेच्या हातात असेल.

Wah khupach chhan
LikeLike