प्रयोगाचे नाव: पाण्याची रहस्यमय पातळी
उद्दिष्ट: पाणी कोणत्या पात्रात आहे यावर पाण्याची पातळी अवलंबून नसते. ते स्वत:ची पातळी शोधते.
साहित्य: ३ पाण्याच्या बाटल्या (दोन बाटल्या तिसऱ्या बाटलीपेक्षा थोड्या मोठ्या असाव्या), २ स्ट्रॉ, चिकटवण्यासाठी फेव्हीकॉल, एम सील, खाण्याचा किंवा रंगविण्याचा रंग.
आकृती:

कृती:
१. आकाराने मोठ्या दोन बाटल्यांच्या खालील एक तृतीयांश भागात भोके पाडून घ्या. (यातून स्ट्रॉ आत जाईल इतकेच ते भोक असावे याची काळजी घ्या.)
२. याचप्रमाणे लहान बाटलीच्या तळाशी समोरासमोर दोन भोके पाडून घ्या. (स्ट्रॉ जेमतेम आत जाईल अशा पद्धतीने)
३. दोन स्ट्रॉ च्या मदतीने दोन मोठ्या बाटल्यांच्या मधोमध लहान बाटली अशा पद्धतीने बाटल्या एकमेकींना जोडा.
४. मोठ्या दोन बाटल्यांची झाकणे काढून ठेवा. त्यापैकी एका बाटलीत पाणी घाला.
५. एका बाटलीतून दुसऱ्या अशा प्रकारे पाणी तिसऱ्या बाटलीत जाईल, जेव्हा दोन्ही मोठ्या बाटल्यांमधील पाण्याची पातळी समान दिसेल त्यावेळी मधल्या लहान बाटलीचे झाकण उघडा.
तुम्हाला काय दिसून येईल?
१. ज्यावेळी तुम्ही एका बाटलीत पाणी घालता, त्यावेळी तिन्ही बाटल्यांमधील पाण्याची पातळी वाढताना दिसून येईल.
२. लहान बाटलीतील पाण्याची पातळी उरलेल्या दोन मोठ्या बाटल्यांतील पाण्याच्या पातळीपेक्षा कमी असल्याचे दिसून येईल.
३. परंतु, जेव्हा लहान बाटलीचे झाकण उघडाल तेव्हा त्या बाटलीतील पाण्याची पातळीसुद्धा इतर बाटल्यांतील पाण्याच्या पातळीप्रमाणे वाढेल व तिन्ही बाटल्यांमधील पातळी समान होईल.
निरीक्षण:
१. आपल्याला दिसून येईल की पाण्याच्या बाटलीच्या आकारावर पाण्याची पातळी अवलंबून नाही.
२. ज्या बाटलीचे झाकण उघडे होते त्या बाटलीत पाणी भरले गेले.
३. बाटलीचे झाकण बंद असल्याने हवेचा दाब असल्याने विशिष्ट पातळीपेक्षा अधिक पाणी बंद बाटलीत शिरू शकत नव्हते.
अनुमान:
पाणी कोणत्या पात्रात आहे यावर पाण्याची पातळी अवलंबून नसते. ते स्वत:ची पातळी शोधते.