गॅमा किरण क्ष किरणांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात. त्यांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाची आवश्यकता भासते. ही दुर्बीण उपग्रहाच्या मार्फत पृथ्वीच्या वायुमंडलाच्यावर सुमारे १५०- ३५,००० किमीच्या पल्ल्यापर्यंत जाऊ शकते. फर्मी गॅमा किरण दुर्बीण ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आली. यातील लार्ज एरिया दुर्बीण संपूर्ण आकाशाचे गॅमा किरणांमध्ये निरीक्षण करून आकाशगंगेचे सक्रिय केंद्रक, स्पंदक, इतर उच्च ऊर्जेचे स्रोत व कृष्णद्रव्य ई.चा अभ्यास करते. तर गॅमा-रे बर्स्ट मॉनिटर गॅमा किरणांच्या स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो. (वरील छायाचित्र: फर्मी गॅमा किरण दुर्बीण)

क्ष किरण किंवा गॅमा किरण दुर्बिणीप्रमाणे अतिनील किरणांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाची आवश्यकता भासत नाही. फुग्याचा वापर करून पृथ्वीतलापासून सुमारे २५-३० किमी उंचीवर दुर्बीण पाठविल्यास बहुतेक प्रयोग करता येऊ शकतात. १९७३ मध्ये कोपर्निकस ही दुर्बीण अवकाशात पाठविण्यात आली. विश्वात ड्युटीरियम (जड हायड्रोजन) चा साठा किती प्रमणात आहे याचा पहिला अंदाज या वेधांतून घेण्यात आला. १९७८ ते १९९६ पर्यंत इंटरनॅशनल अल्ट्राव्हायोलेट एक्सप्लोरर (IUE) म्हणून ओळखल्या जाणार्‍या परिभ्रमण वेधशाळेने अतिनील किरणोत्सर्गाच्या खगोलीय स्त्रोतांचा अभ्यास केला. या दुर्बिणीमध्ये ४५ सेमीचे आरसे होते आणि तिने १०० नॅनोमीटर लहरलांबीपर्यंत माहितीचे संकलन केले. ह्या दुर्बिणीतून विविध अणुरेणूंच्या अंतराळातील अस्तित्वाची व प्रमाणाची कल्पना येत आहे. २००३ मध्ये प्रक्षेपित केलेला गॅलेक्सी इव्होल्यूशन एक्सप्लोररने  आकाशगंगांमधील उष्ण अशा अतीनवताऱ्यांचे निरीक्षण केले. हबल दुर्बीण देखील अतिनील किरणांचे निरीक्षण करण्याचे काम करू शकते. मे २००९ मध्ये तिने ११५ ते ३२० नॅनोमीटर  दरम्यान प्रकाशासाठी संवेदनशील वर्णपट स्थापित केला.

(छायाचित्र: इंटरनॅशनल अल्ट्राव्हायोलेट एक्सप्लोरर)