अमित शर्माने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. आजकाल असे ही म्हणजे टिप्पीकल गाणी, मसाला स्टोरी नसलेले चित्रपट सुद्धा येतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं यशही मिळवतात. अर्थात प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत असं म्हणूया.

आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा अशी हटके चित्रपट करणार्या कलाकारांच्या अभिनयाने सुरेख विणलेला हा भलताच समंजस बाळंतविडा आहे.ही गोष्ट आहे मेरठमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची. जितेंद्र निवृत्तीच्या जवळ पोहचलाय. त्याला दोन तरुण मुलं आहेत. पन्नाशी ओलांडलेल्या या जितेंद्रची पत्नी गर्भवती असल्याचं समजतं. त्यावर इतर कोणताही विचार न येता ती मूल वाढवण्याचं ठरवते. जितेंद्र गोंधळतो, त्याच्या आईकडून सल्ला किंवा कदाचित धैर्य घ्यायला म्हातार्या आईशी बोलतो, झोपेच्या गुंगीत ती शिक्कामोर्तब करून टाकते. आता ही गोष्ट जवळपासच्या लोकांमध्ये चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनू लागते. यामुळे सर्वात मोठा धक्का बसतो तो तिच्या दोन तरुण मुलांना म्हणजेच नकुल (आयुष्यमान खुराना) आणि गूलर (शर्दुल राणा) यांना. नकुल स्वत: रेने (सान्या मल्होत्रा) या मुलीच्या प्रेमात आहे आणि तिच्याशी विवाहाची स्वप्न पाहतोय. त्यात अचानक त्याला आपली आई गर्भवती असल्याचं समजल्यानंतर त्याच्यासाठी ही परिस्थिती भलतीच लाजिरवाणी होते.

आता अशा परिस्थितीमध्ये नकुल आणि गुलर चे पुढचे काही महिने सिनेमाचे लेखक अक्षत घिलडियल याने अगदी हलक्याफुलक्या पद्धतीनं आपल्यापुढे उलगडून दाखवले आहेत. मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध जीवनातील टप्पे, सततचा लोकांना काय वाटते हा विचार, लाजणं खरं तर… इतका संवेदनशील विषय लोकांना कोणताही डोस न पाजता आपण अनुभवू शकतो. उत्तम अभिनय आणि तिरकस विषयाची सहजसुंदर मांडणी!!!

संपूर्ण सिनेचमूला बधाई हो बधाई!!!