नावातच पु.लं आणि कविता, सुनीताबाई सादर करणार मुक्ता बर्वे, अभिवाचनाचा फॉर्म्याट, जवळपास बारा वर्षांनी कॉलेजच्या नाटकाच्या टीममधल्या मैत्रिणी आणि बालकांना सांभाळण्यासाठी नवऱ्याला असलेला वेळ यामुळे काल यशवंतरावला असलेला एक सुरेख नाट्यप्रयोग अनुभवता आला… ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे.’
सहज सुंदर विषय, सुटसुटीत नेटकं नेपथ्य, विषयाला अनुरूप किंबहुना पुढे घेऊन जाणारं संगीत, वैद्य न् केळकरांचं सुरेल गायन, वझे दांपत्याची उत्कृष्ट कथाकथन शैली, आणि मुक्ताने सादर केलेल्या कवितेचा हळवा कोपरा अलगद उलगडणाऱ्या सुनीताबाई…वा: क्या बात है!
लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेवर आधारलेलं हे नाट्य, पण त्या प्रसंगातील मूळ पात्रच होती पु. लं आणि सुनीताबाई, मग त्याचा सोहोळा होणं हे क्रमप्राप्तच! त्यात प्रसंगाचा धागा म्हणजे ‘कविता’. प्रत्येक संवेदनशील माणसाला जगण्याचं कारण देऊन जाणारा, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा एक अनुभव! हो, अनुभवच! रोजच्या गद्य आयुष्यात वाट वाकडी करून चालण्याचं धाडस देते ते पद्यच! मग त्यात शिवाय छंद, यमक, प्रास, स्वर, लयीचा साज चढला की ते आडवळणच तेजोमय वाटू लागतं, अक्षरधन मनात रुंजी घालू लागतं आणि ‘आपण जिवंत आहोत की अजूनही!!!’ अशी एक कम्माल जाणीव होऊन जाते…अगदी दुसऱ्या दिवशीचं गद्याचं पान उलगडण्याच्या उर्मीसकट!!
कालचा हा कार्यक्रम पाहून ऐकून माझ्याही मनात कवितेच्या अनंत आठवणी दाटून गेल्या. वाचलेली पहिली कविता, आवडून लक्षात राहिलेली कविता, पाठांतराची कंपल्सरी मार्कांची कविता, स्पर्धेतली कविता, काव्यवाचनासाठी निवडलेली कविता, नकळत कागदावर उमटलेली कविता, रुसून अपूर्ण राहिलेली कविता, फसून हास्याचं कारण ठरलेली कविता, कळलेली कविता, दुर्बोध कविता, पावसाची कविता, कट्ट्यावरची कविता, शाबासकीची कविता, रात्रीची पहाटेची कविता, आणि आज गवसलेली ही समृद्धीची, श्रीमंतीची, आनंदयात्रेची कविता!!
आवर्जून पाहावा असा हा कवितेचा सोहोळा, सर्वांनी जरूर अनुभवा!!
पुलं आणि सुनीताबाईंनी सादर केलेल्या बोरकरांच्या कविता… आनंद यात्रा कवितेची या कार्यक्रमाची लिंक अलूरकर म्युझिक कंपनीने अपलोड केली आहे, त्यांचे शतशः धन्यवाद!!
https://youtu.be/W4d_G1rwM0Y?si=-qj2zxGHVcxhulO7… भाग १
https://youtu.be/lyVY027FpKk?si=kCueqhnPOe4NioFO… भाग २
एका मासिकात पुलं वर लिहिलेला लेख: https://wordspanorama.com/2018/10/26
