
गोंगाट आहे म्हणता, मला तरी तसे अजिबात वाटत नाही
रोजच्या रोज रस्त्यावरुन मी ही गाडी चालवते…
म्हणजे माझी तशी इच्छा असते.
मग सिग्नल लागतो, मी थांबते…
काही जण हॉर्न वाजवतात,
मी सिग्नल कडे बघते.
मग ते पुन्हा हॉर्न वाजवतात,
मी बाजूला होऊन त्यांना जागा करून देते…
म्हणजे हे एक असं संवादाचं माध्यम असतं, तो गोंगाट नसतोच मुळी!
काय झालं, गर्दी वाढली आहे… काहीतरीच काय
रोज अगदी रोज मी आणि माझी गाडी दोघीच असतो
बाकीचे असतात ते देशबांधव… त्यांना काय गर्दी म्हणतात?
आणि मुळात देव माणसात पाहावा…मग या एवढ्या जनसमुदायाच्या रुपानं देवदर्शन होत असतं
प्रदूषण कुठलं आलंय… माझे मत अगदी भिन्न आहे
धूर आणि धुळीचे लोटच असतात प्राणवायू
त्यातून वाट काढत शांत चित्ताने एकेक इंच पुढे जायचं असतं
हवा अशीच असते की जगभर!
आता सिग्नल मिळालाय असं ठरवून एक गाडी जोरात पुढे येते,
मला धक्का लागतो मी न राहवून म्हणतेच, काय हे… किती घाई,
त्यावर मुजोर उत्तर मिळतं.. हो आहे घाई.
मग हिरवा रंग… गाडी सुरू… आणि फ्लोरोसंट शिट्टीवाला एकदम अवतरतो…
समोर देशाच्या प्रगतीचं प्रतीक आकार घेत असतं…
आणि मुळात माणसाला निराकारता सहनच होत नाही,त्यामुळे मूर्ती हवी, प्रतीकं हवी आणि हो प्रगतीही हवी.
मग एक हा फ्लोरोसंट मार्गदर्शक क्रेनकडून करून घेत असलेलं काम तिथला प्रत्येकजण याची देही याची डोळा मनात साठवून घेतो…
मग गर्दी नसणारा जनसमुदाय अस्वस्थ होतो!
गोंगाट न करणारे हॉर्नच फक्त ऐकू येतात!
प्रदूषण भूषणावह मानून आम्ही पुढे वाहात राहतो!