रात्रीच्या वेळी आकाशात पहिले की आपल्याला शेकडो चांदण्या लुकलुकताना दिसतात. त्या चांदण्या म्हणजेच दुसऱ्या कुठल्याशा आकाशगंगेतील सूर्यमालेचे सूर्य असू शकतात. स्वयंप्रकाशित असणारे हे तारे इतक्या दूर असतात की ती आपल्याला केवळ लुकलुकणारी तेजोमय बिंबे दिसतात. अमेरिकन अवकाश संस्था नासाने तयार केलेली जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात प्रक्षेपित केली गेली. ही अधोरक्त (इन्फ्रारेड) दुर्बीण आहे (सूर्यप्रकाशात आढळणारे असे किरण ज्यांची तरंगलांबी दृश्य किरणांपेक्षा अधिक असते.) अधोरक्त किरणे पाहण्याची शक्ती आणि संवेदनक्षमता यामुळे हबलसाठी ज्या वस्तू खूप दूरच्या आणि अस्पष्ट वाटतात त्या जेम्स वेब सहज पाहू शकेल.

ही दुर्बीण जवळपास तीन मजली इमारतीच्या उंचीची आणि टेनिस कोर्टच्या लांबीइतकी आहे. या दुर्बिणीच्या आतील उपकरणांचे, व आरशांचे सूर्यकिरणांच्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी तिच्यावर एक कवच बसविले आहे. सूर्याच्या समोर असणाऱ्या भागाचे व त्यामागील भागाचे तापमान बघता त्या दोहोंमध्ये ३१५ अंश सेल्शियस इतका फरक आहे. १८ लहान आरसे जोडून दुमडून एक मोठा आरसा तयार करण्यात आलेला आहे. ही दुर्बीण पृथ्वीपासून जवळपास १.५ दशलाख किमी अंतरावरून फिरणार आहे. या संपूर्ण दुर्बिणीचे तापमान वजा २३० अंश सेल्शियस असे राखण्यात येणार आहे. जेणेकरून तिचा कॅमेरा अधोरक्त किरणांच्या आधारे अंतराळाचे निरीक्षण करेल. धुळीच्या ढगांआड अनेकानेक तारे आणि ग्रह जन्माला येत असतात. लुकलुकणाऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या दूरवरच्या ग्रहांची ताऱ्यावर जेव्हा सावली पडते, तेव्हा ताऱ्याचे तेज काही प्रमाणात कमी होते, त्याचा अभ्यास करून या दूरस्थित ग्रहांचे ताऱ्यापासूनचे अंतर आणि त्यांचा आकार शोधण्याचा प्रयत्न या दुर्बिणीचा वापर करून केला जाईल.
सूर्याला केवळ अर्धी प्रदक्षिणा होईतोवर, सहा महिन्यात ही दुर्बीण संपूर्ण आकाशाचे निरीक्षण करू शकेल. या दुर्बिणीच्या सहाय्याने विश्वाच्या विस्ताराचा, पहिल्या तार्याच्या किंवा आकाशगंगेच्या निर्मितीचा, संभाव्य राहण्यायोग्य ग्रहांच्या बाजूला असलेल्या वातावरणाचा तपशीलवार अभ्यास केला जाईल. ही दुर्बीण जून 2022 च्या अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होईल.
