रिकन्स्ट्रक्शन होतंय ही खरं तर काही फार वेगळी घटना राहिलेली नाही, पण आपण ज्या घरात तीस चाळीस वर्ष राहात होतो ती जागा सोडून दुसरीकडे जायचं हे जरा कठीणच जातं. फार पूर्वीच्या काळापासून मंजे अगदी वसाहती निर्माण झाल्या तेव्हापासून जुन्याचं नवीन करत असेलच ऐतिहासिक माणूसही. असो, तर तसंच आमच्याही घराचं रिकन्स्ट्रक्शन होतंय हे ठरलं… एकदाचं … 

गेली आठ वर्ष हा विषय चघळत चघळत शेवटी ही रिकन्स्ट्रक्शनची गाडी मार्गी लागली. अनेकांची अनेक मतं, दुमतं, सहकार, असहकार, इगो, भाव-भावनांतून रस्ता काढत काढत इमारत पुन्हा नव्यानं उभी राहीन म्हणतेय… बघूया काय काय होतं… 

तसं बघायचं तर आमची इमारत चाळिशीची आणि इमारतीतील मंडळी वय हा नुसता आकडा असतो वगैरे म्हणायला लागलेली …हं हं साधारण साठ पासष्ट किंवा त्याहूनही तरुण. तर अशा मंडळींनी ही रिकन्स्ट्रक्शनची मोट वळलेली आहे. तसं हे रिकन्स्ट्रक्शन मला मिसळ किंवा भेळेसारखं वाटतं… अनुभव, आठवणी, हेवे दावे, गोंधळ, आणि बरंच काही…आता खरं सांगायचं तर माझ्या डोक्यातल्या विचारांचंही असंच काहीसं भयाण झालंय. घराला रंग दिला की ते एकदम वेगळंच दिसायला लागतं नां मग ही पुनर्बांधणी तर काय काय करून जाईल देव जाणे ? 

एकीकडे हे सगळं कसं चांगल्यासाठी होतंय, त्यानिमित्ताने सगळा कचरा आवरला जाईल, जमिनीचा रेट काय वाढेल असं चालू तर दुसरीकडे हल्लीचं पूर्वीच्या बांधकामासारखं राहिलेलं नाही, भिंती किती बारीक असतात, उंची किती कमी, खोल्या ह्या अशा छोट्या छोट्या, गॅलरी तर नाहीच, सुपर बिल्ट अप बघायचा म्हणे, कार्पेट एरिया बघायचा काळ गेला, सवयीची जागा सोडून या वयात भाड्याची जागा शोधायची का लांबची? आता असं घर कुठे मिळणार परत? लॉफ्ट तर गेलेच हो (कुणाचं काय तर कुणाचं काय… एखाद्याचा जीव माळ्यातच अडकलेला असतो.)

या सगळ्या किंतु-परंतु बरोबरच सगळ्या घरमालकांनी एक शत्रू मिळवून आणलेला असतो तो म्हणजे बिल्डर, त्यांच्याच घराची जागा घेऊन त्यांनाच त्यांच्या घराचं विलोभनीय स्वप्न दाखवत तो असा काही गेम खेळतो की सगळी मंडळी वाढलेल्या किमतीच्या फुग्यात उंच उंच उडत स्वतःचा गल्ला भरणाऱ्या बिल्डरच्या मनातलं व्यावहारिक चित्र पार विसरून जातात. 

घर ही एक कमाल गोष्ट असते नां अगदी जवळची, हक्काची, प्रेमाची अशी. खरं बघायचं तर तेवढंच तर विश्व असतं की आपलं. मग ते दुसऱ्याच्या दृष्टीने कसं आहे याला काही महत्त्व नसतं. घरातली वडील मंडळीच नाही तर ते घरही आपल्यावर संस्कार करीत असतं. आज इमारतीबाहेर रिकन्स्ट्रक्शनचा बोर्ड टांगलेला पाहिला आणि अंनत आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. स्वतःच्या जन्मापासून मुलाच्या जन्मापर्यन्तचा काळ … त्यातल्या प्रत्येक टप्प्यावरचे क्षण मनात दाटीवाटी करू लागलेत, अचानक त्यांनी रिकन्स्ट्रक्ट व्हायचं मंजे नव्या क्षणांना जागा करून द्यावी लागणार, काही कोंडले जाणार, काहींना घुसमटल्यासारखं होणार, काही मोकळे होऊ बघणार, काही लपून बसणार, काही सुटल्याचा आनंदात असणार तर काही पुन्हा न भेटण्याच्या दु:खात. कुणास ठाऊक क्षणांना मन असेल का आणि आठवणीना आवाज… छे: विषयाची वाट पार वाकडी होऊन गेली नां … चालायचंच, इमारतीची पाळंमुळं उखडायची आणि तिला नव्यानं उभारायचं तसंच मनाचंही नको का करायला? आधी हव्या त्या गोष्टींचं सॉर्टिंग करून मग त्यातल्या नको त्यांवर फुल्या अन हव्या त्याच्या पिशव्या भरायला हव्या, ज्या त्या कप्प्यांची नावं घालून बॉक्स भरले की त्या ही रवाना होणार नव्या जगात. 

कितीही शिकवलं नां तरी चार-सहा आठवणी मात्र गळा काढतातच, आजोबांना जेवायला बोलावायला जाताना घरभर हॉर्न वाजवत न्यायची छोटी गाडी कुठेशी ठेवावी?, दंगा करू नकोस हे वाक्य पुरं व्हायच्या आत मोडून घेतलेला हात आणि त्यावरचं ते मिरवलेलं प्लास्टर कुठेशी लपवायचं? घरभर अभ्यासाच्या नावाखाली केलेली पेन्सिलची टोकं, पाटीवरच्या पेन्सिलची पेस्ट, झाडाच्या पानांचं कूट, विटेचा चुरा, यांनी भरलेली गॅलरी ठेवावी कुठल्या दिशेस? पहिलं चित्र, पहिलं बक्षीस, पहिली शाबासकी, यांची बॅग न्यावी का सोडावी… संध्याकाळी अंगणात खेळलेले खेळ, आरडाओरडा, लिंबू टिंबू ते राज्य घेण्यापर्यंत चा प्रवास, तिथले मित्र मैत्रिणी, जिन्याची घसरगुंडी, गणपतीची आरती, लांबच लांब गच्ची, घराखालून येणाऱ्या हाका, फालतू वेळ घालवायलाच म्हणून कि काय बांधलेली भिंत, टिवल्या-भावल्यांचा आवाज वाढला कि रागवणाऱ्या खोचक गॅलऱ्या हे असलं कुठे न कसल्या गाठोड्यात बांधायचं? आईला दिलेली उलट उत्तरं, खाल्लेला दणका, बुडलेली लेक्चर्स, नातेवाईकांना न ओळ्खल्याने न उघडलेली दारं असल्या आठवणी मुसक्या बांधून माळ्यावर ठेवल्या तरी त्या उड्या मारून खाली यायला बघणारच… बाकी… देवाचा कोपराही निमूट येईल नेऊ तिथे, घरात एकत्र वाचलेली पुस्तकं, पाहिलेले सिनेमे, नाटकं, ऐकलेली गाणी, खेळलेल्या भेंडया, वाद, भांडणं, हशा असलं काय काय कुठल्याशा कोपऱ्यांना चिकटून राहिलच जाऊ तिथे कुठेही;… 

इमारतीच्या रिकन्स्ट्रक्शनचा हा प्रवास भलताच जड जाणार तर… प्रत्येक खोली अगदी भरून राहिली आहे आठवणींनी, घरातून बाहेर पडणाऱ्या पावलांबरोबर एकेक आठवण साठवत न सोडत निघालोय… एकेका मजल्यावरून खाली उतरताना त्याही मग इतिहासजमा होतील, गाड्या न लागलेलं ते इमारतीचं आवारही अगदी जुन्यासारखंच दिसतंय की, पूर्वीच्या लपायच्या जागा लख्ख मोकळ्या झाल्यात, डबडा ऐसपैस साठी प्रत्येकजण कुठे ना कुठे गुडूप होऊन जाणार धप्प्याची वाट बघत आणि उडवलेल्या डबड्याच्या आवाजाचा कानोसा घेत…  

क्रमशः