कंटाळा म्हणजे आळस नाही!!

Published by

on

दिवसाला असं सकाळी सकाळी उठवायचं
डोळे चोळून चोळून गदागदा हलवत जागं करायचं
तोही मग ओढल्यासारखा रखडत रखडत उभा राहतो
कशाचच काही वाटत नसल्यासारखा तेच तेच करत राहतो
बरं वाईट राग लोभ आशा निराशा यांच्या पल्याडची शांतता
त्याला ढकलून ढकलून संध्याकाळच्या स्वाधीन करायचं
वाटच बघत तोही चक्क सज्ज होतो उत्साहानं संपायची सुरुवात करायला
समजावतो स्वतःला ‘कंटाळा म्हणजे आळस नाही.’
प्रचंड तुडुंब अशक्य अचाट अफाट की काय म्हणतात तसला कंटाळा
चारी दिशांनी वेगानी चाल करून येतो
तेव्हा त्याची बारीकशी पुरचुंडी करून
तिला मग एक टिचकी मारून फेकून देतो तो
दूर कुठेतरी अनवगत अशा पोकळीत किंवा
अदृश्य करणाऱ्या त्या आईनस्टाईनच्या काळ्या विवरात
सगळा मॅटर खलास झाल्याच्या आनंदात असणाऱ्या दिवसाला
तो कंटाळा मग दात विचकत खदाखदा हसत बसतो अँटीमॅटर बनून
काळ साधारणपणे दशकाने पुढे गेल्यावर हे गाणं ऐकलं आणि पुन्हा या कवितेची आठवण झाली,
बरं ते गाणं भाडीपा चं… माझं वागणं असं आहे की एक तर ते पटेल…
https://youtu.be/Z68FFdyNYDg?si=O7g9NcAl6551jTVW
कमाल केली आहे… आई आणि मी चे सगळेच व्हिडिओ झकास आहेत… हे गाणं पण तसंच..क ड क!
हॅलो एलॉन ….. _/\_