
लोकांच्या बाबतीत रस्ता असतो सरळसोट, ठराविक, शिस्तशीर
आमच्याच रस्त्यात मेले खाचखळगे, आड-विहिरी, आणि आडवे-तिडवे खांब.
लोकांना नसतात प्रश्न, नुसती उत्तरच उत्तरं.
आमच्या मनात मात्र कुठलाच प्रश्न कसा नाही हाही एक प्रश्न.
लोकांची गणित एकदम सोप्पी आणि सुटणारी, बेरीज-वजाबाकीची.
आमच्या गणितात मात्र कोडीच न उलगडणारी, एकशे सत्तावन्न टक्क्यांची.
एवढं खरंच मी बघून ठेवलंय….
इतरांच्या बागेत कधी पालापाचोळाच नसतो म्हणे, सदैव डवरलेली झाडं.
आम्ही कितीही पाणी घातलं तरी एका फुलाचंंही नाही देणं.
इतरांचे चंद्रसूर्य, वेळेवर उगवणारे, वेळेवर मावळणारे.
आम्हाला नसतात चंद्रसूर्य, फक्त घड्याळाचे काटे टीकटिकणारे.
इतरांना लागतात वाऱ्याच्या झुळका, मंद सुगंध येतो ओल्या मातीचा.
आम्ही बसतो उगाळत चंदन, साधा लवलेश पण नाही गंधाचा.
मी खरंच बघून ठेवलंय इतरांना,
आमच्यापेक्षा सहज पुढे जाताना,
आलेला प्रश्न चुटकीसरशी सोडवताना,
गणितातली कोडी अलगद उलगडताना,
हिरव्या हिरव्या रानाशी मैत्री करताना,
सुर्याला अर्घ्य देऊन विनम्र होताना,
न् वाऱ्याच्या तालावर बेधुंद नाचताना…..
खरंच मी बघून ठेवलंय इतरांना.
